तिरोडा : जिल्हा पोलीस विभाग आणि अदानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तिरोडा तालुक्यातील युवक-युवतींसाठी पोलीस व सैन्यभरतीपूर्व प्रशिक्षण तिरोडा येथे सुरू आहे.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अदानी पॉवर प्रकल्प प्रमुख कांती बिश्वास यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन वर्षांपासून हे शिबिर घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पोलीस विभागाने नेमून दिलेल्या प्रशिक्षकांमार्फत दररोज सकाळी ७ ते १० या वेळेत युवक-युवतींकडून पोलीस व सैन्यभरतीच्या दृष्टीने सराव करून घेतला जात आहे, तर सकाळी १० ते १२ या वेळेत लेखी परीक्षा घेतली जात आहे. आतापर्यंत या प्रशिक्षणाच्या माध्यमातून १३ विद्यार्थ्यांची सैन्यामध्ये निवड झाली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींची पोलीस व सैन्यामध्ये निवड व्हावी, हा या मागील उद्देश आहे. जास्तीत जास्त युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे अदानी फाउंडेशन प्रमुख नितीन शिरालकर यांनी कळविले आहे. प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अदानी फाउंडेशनचे कार्यक्रम अधिकारी राहुल शेजव व प्रशिक्षक वसीम खान, प्रशांत कावळे, सचिन बिसेन यांच्याशी संपर्क करावा, असेही सांगण्यात आले आहे.