पवनी : माध्यमिक शाळांची संच मान्यता सप्टेंबरअखेर मिळणार आहे. याची तालुकानिहाय शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्य.) किसन शेंडे यांनी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिका-यांना दिली. शिक्षणाधिकारी (माध्य) यांचे कक्षात घेण्यात आलेल्या सभेत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वेतनविषयक समस्या व त्यावरील उपाययोजना, सन २०१४-१५ व २०१५-१६ ची संचमान्यता, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न, सरल डाटाबेस प्रणालीद्वारे शाळांची माहिती भरताना उद्भवणाऱ्या समस्या, उच्च माध्यमिक वर्गाची संचमान्यता करण्यासाठी जिल्हास्तरावर शिबिराचे आयोजन करणे, विविध शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी करण्यात उद्भवणाऱ्या समस्या, सन २०१४-१५ आर्थिक वर्षातील टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफीचे प्रस्ताव या व अन्य विषयांवर शिक्षणाधिकारी (माध्य) किसन शेंडे यांचेसोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक संघाचे विभागीय कार्याध्यक्ष अशोक पारधी, जिल्हा सचिव जी. एम. टिचकूले, सहसचिव अविनाश डोमळे, अनमोल देशपांडे, सुरेश गोमासे, आरती धकाते, भास्कर चांदेवार, अनमोल देशपांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी मुंडे व उपशिक्षणाधिकारी भोंगाडे यावेळी उपस्थित होते. शिक्षणाधिकारी शेंडे यांनी समस्या त्वरीत सोडविण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)
सप्टेंबरअखेर मिळणार संचमान्यता
By admin | Published: September 14, 2015 12:26 AM