लक्षांक १२ हजार खड्डे ६८७ : रोपांची कमतरता, अधिकारी गांभीर्य नाहीतराजू बांते मोहाडीपर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीचा संकल्प करणारा महत्वाकांक्षी कार्यक्रम पंचायत समितीच्या माध्यमातून गावा गावात राबविली जाणार आहे. वृक्ष लागवडीसाठी मोहाडी पंचायत समितीने नियोजन आराखडा कृती कार्यक्रम तयार केला असला तरी हा आराखडा नियोजनशुन्य दिसून आले. झाडेच पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून वाचवू शकतात, हाच उद्देश ठेवून राज्य शासनाच्यावतीने १ जुलै रोजी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी शासनाकडून निधी नाही. लोकसहभागातून वृक्ष लागवड करायचे आहे. मोहाडी पंचायत समितीने ७६ ग्रामपंचायतीला ७६० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. १८४ अंगणवाड्यामधून ९२० रोपटे, १५५ शाळांमधून १५५० रोपटे, २४ प्राथमिक आरोग्य केंद्रात १८८ तर पशुसंवर्धन विभागाला १३० रोपटे लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले आहेत. ३,५४८ वृक्ष लागवडीचे पंचायत समितीने नियोजन उद्दिष्ट तयार केले होते. त्यानंतर ७,६०० वृक्ष लागवडीसाठी पूरक नियोजन तयार करण्यात आले. वृक्ष लागवडीसाठी तेवढे खड्डे केले नाहीत. खड्डे तयार नाहीत तर वृक्ष लावणार कुठे? हा प्रश्न निर्माण होतो. १५ जूनपर्यंत खड्डे खोदण्यात यावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु पंचायत समितीच्या वृक्ष लागवडीचे नियोजन कागदावर दिसून येत आहे.पंचायत समितीने सामाजिक वनीकरण विभागाला विनामूल्य रोपांचा पुरवठा करण्यासंबंधी पत्र दिले. मात्र तेवढी रोपे तालुक्यात असणाऱ्या नर्सरीत नाहीत. रोहा येथे खाजगी रोपवाटिका आहे. सामाजिक वनीकरण विभागाची तालुक्यात रोपांची रोपवाटिका नाही. सामाजिक वनिकरण विभागाचे अधिकारी नकूल आडे यांना वृक्ष लागवड करण्यासाठी किती रोपांच्या मागणीचे कोणत्या विभागाने पत्र दिले, याविषयी संपर्क केला. सातत्याने एक आठवड्यापासून सामाजिक वनिकरण तालुका अधिकारी कोणत्या ना कोणत्या कारणाने कार्यालयात अनुपस्थित राहत आहेत. येतात कधी, जातात कधी, आले तर जाण्याची घाई असा त्याच्या नित्यक्रम बनला आहे. त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी, साहेब वृक्ष लागवड कार्यक्रमात व्यस्त आहेत. ते दौऱ्यावर गेले एवढेच सांगतात. कुठे गेले याची माहिती त्यांनाही नसते. यासंदर्भात नकूल आडे यांच्याशी संपर्क केला असता मी बाहेर आहे, उद्या माहिती देतो, आॅफिसला या असे बोलून टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आले आहे. गुरूवारी संपर्क साधला असता ते नेहमी फोन बंद करीत होते. यावरून त्यांना वृक्ष लागवड कार्यालयाची माहिती दडवून ठेवायची तर नाही? ना असा प्रश्न उपस्थित होतो.१ जुलै रोजी तालुक्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड केली जाईल. लागवडीच्या फोटो काढल्या जातील, पण रोपांच्या संगोपणासाठी कोणते नियोजन करण्यात आले याबाब कोणी बोलायला तयार नाहीत. त्यामुळे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम औपचारिकतेचा राहणार असल्याचे दिसून येते. वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत अधिकारी गांभीर्य नाहीत हे लक्षात आले आहे.
वृक्ष लागवडीची नियोजनशून्य तयारी
By admin | Published: June 26, 2016 12:21 AM