सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दहा-पंधरा मिनिटे झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता, तर जिल्ह्यातील काही भागांत विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रब्बी हंगामातील धान सध्या कापणीस आले असून बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची कापणीदेखील सुरू केली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाचा फटका या कापणी केलेल्या धानाला काही प्रमाणात बसला. हवामान विभागाने अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तविला असल्याने शेतकऱ्यांवरील संकट कायम आहे. तिरोडा तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या धानाच्या पुंजण्यावर वीज पडल्याने धान जळाले. यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अवकाळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:58 AM