भंडारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हे तत्त्व संविधानात फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतले नसून त्यांचे गुरू तथागत बुद्धांपासून घेतले आहे. तसेच शाक्य गणराज्याच्या धर्तीवरच प्रजासत्ताक लोकशाही प्रस्तापित केली आहे. म्हणून बौद्धधर्मियांनी धम्माबरोबरच संविधानिक मूल्यांची जपणूक करावी, असे विचार माजी आयएएस अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
शिंगोरी येथील बौद्ध विहार ट्रस्टच्यावतीने आयोजित बौद्ध स्तुपाच्या लोकार्पण व यातील बुद्ध व बोधिसत्त्वाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या संयुक्त कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ते संविधान व बौद्धांचे आरक्षण या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष महादेव मेश्राम, उद्घाटक भदन्त नागदीपांकर, प्रमुख अतिथी चंद्रबोधी पाटील व प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमृत बन्सोड होते.
याप्रसंगी बौद्ध स्तुपाचे व बुद्ध आणि बोधिसत्त्वाच्या मूर्तीचे धम्मदान करणाऱ्या महादेव मेश्राम व त्यांच्या पत्नी रमाबाई मेश्राम यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल, साडी-चोळी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव भदन्त नागदिपांकर धम्मदेशनेत म्हणाले, प्रत्येक बौद्ध धर्मियांनी केवळ धम्मग्रंथाचे वाचनच करू नये तर धम्माचे आचरण करून एक आदर्श निर्माण करावा, त्यानंतर बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील यांनी भारतीय बौद्ध महासभेची वाटचाल या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरद्वारा स्थापित या संघटनेचा इतिहास व वर्तमानातील वस्तुस्थितीचा धावता आढावा घेतला.
धम्ममंचावर भारतीय बौद्ध महासभा विदर्भ प्रदेशचे शंकर ढेंगरे, मनोहर दुपारे, अनिलकुमार मेश्राम, महेंद्र गडकरी, नीलकंठ कायते, डी.एफ. कोचे, गुलशन गजभिये, एम.जी. नागदेवे, वामन मेश्राम, ॲड. डी.के. वानखेडे, मन्साराम दहिवले, मंगेश हुमणे, रमाबाई मेश्राम आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक एम. डब्ल्यू. दहिवले यांनी संचालन रमेश जांगळे यांनी तर आभार पी.डी. मेश्रमा यांनी मानले. कार्यक्रमासाठी भन्ते गयाकाश्यप, वामनराव रंगारी, चंद्रकला मेश्राम, बाबुराव नागदेवे, दिनेश मेश्राम, नागसेन देशभ्रतार, कल्पना ढोके, जया शिंगाडे, रंजना रंगारी, स्वर्णमाला दहिवले, शकुंतला हुमणे आदींनी सहकार्य केले.