२ एप्रिलला प्रवेशोत्सव : विद्यार्थी गावातच रोखण्याचे प्रयत्न, दीड महिन्यात अध्यापनात गोडी निर्माण होणारराजु बांते मोहाडीगावचा विद्यार्थी गावातच शिकावा, शाळांतील पुर्वानुभवाची माहिती व्हावी, अध्ययनात प्रवेशापासूनच गोडी निर्माण केली जावी आदी हेतूने पे्ररित झालेल्या शिक्षण विभागाने एक पाऊल पुढे जावून शैक्षणिक सत्र सुरु होण्यापूर्वीच पहिलीचा प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या सुचना प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहे.कॉन्व्हेंट संस्कृतीचे जाळे खेड्यापाड्यात पसरले आहे. गावातला विद्यार्थी प्रारंभापासूनच इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी गावाबाहेर पडत आहे. अलीकडे तर मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमात विद्यार्थ्यांनी नर्सरीपासूनच प्रवेश घ्यावा यासाठी स्पर्धा चालली आहे. कॉन्व्हेंट संस्कृतीच्या आकर्षणामुळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडायला लागल्या आहेत. राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी सन २०१५-२०१६ या शैक्षणिक सत्रापासून सुरु करण्यात आली आहे. सर्व मुले शिकू शकतात हा विश्वास कुमठे बीटमधील शाळांमध्ये सुरु असलेल्या ज्ञानरचनावाद पध्दतीने सार्थ केला. आज स्थितीत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जून्या अध्ययन पध्दतीला दूर सारुन शिक्षक ज्ञानरचनावाद पध्दतीचा अवलंब करु लागली आहे. आता जिल्हा परिषदेतील शिक्षण उच्चस्तरावर नेण्यासाठी शासन, प्रशासनस्तरावरुन विविध प्रयोग केली जात आहेत. त्यामुळे शाळा शिक्षणात समृध्द होत चालल्या आहेत. आता तर सहावी ते आठवीमध्ये सेमी इंग्रजी विषयाचे अध्यापन केले जात आहेत.जिल्हा परिषद शाळांची संख्यात्मक बाजू अधिक बळकट व्हावी यासाठी पुढचं नवीन शैक्षणिक सत्र सुरु होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात पहिल्या वर्गात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सवाची तयारी झाली आहे. मोहगाव/देवी केंद्रांतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय पूर्व माध्यमिक शाळा, मोहगाव देवी येथे विशेष तयारी केली गेली आहे. मोहाडी तालुक्यात २ एप्रिल रोजी एकाच दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मोहाडी तालुक्यात आठ बिटामधून ७३३ मुले व ७४७ मुली असे एकुण १४८० मुले प्रवेश पात्र आहेत. महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी जी. आर. लांजेवार यांनी अंगणवाडी व बालवाडी केंद्रातील कर्मचाऱ्यांना सांगून बालवाडीमधील बालकांना नजीकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश देण्यासाठी मदत करावी अशा सुचना दिल्या आहेत. शाळेत लहान मुले प्रथमच येणार आहेत. पहिल्या इयत्तेची वर्गखोली आकर्षक करण्यात आल्या आहेत. शिवाय गावात शिक्षणाची जागृती व्हावी, मंगलमय वातावरण निर्माण व्हावे यासाठी ढोल-तासे, लेझम, कलश घेवून प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. वाजतगाजत विद्यार्थ्यांना शाळेत पालकासह आणले जाणार आहे. गुलाबासारखे शिक्षणात फुला हा संदेश देण्यासाठी प्रत्येक नवीन विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प दिला जाणारा आहे. सत्र आरंभाच्या सुरुवातीला प्रवेशीत विद्यार्थ्यांना नवा अनुभव घेता येईल. प्रवेशासाठी मे-जून महिण्याचा उन्हाच्या तडाख्यात फिरण्याची मेहनत वाचविता येईल. प्रसन्न ते नवीन विद्यार्थ्यांना आनंददायी अध्यापन करता येणार आहे. एकूणच जिल्हा परिषद शाळांतील मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक प्रवेश उत्सव साजरा करण्यासाठी तन्मयतेने उत्सूक झाले आहेत.
मुदतीपूर्वीच जिल्हा परिषद शाळात प्रवेशोत्सव
By admin | Published: April 02, 2016 12:32 AM