मुख्य कार्यकारी अधिकारी : जिल्हा परिषदेत कर्मचारी बदली सत्रभंडारा : जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांची स्थांनातरण प्रक्रिया राबविण्यात येत असून हे स्थांनातरण नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. याशिवाय कुणावरही अन्याय होऊ नये, याची काळजी घेण्यात आली असून कर्मचाऱ्यांना न्यायानुसार प्राधान्यक्रम दिल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.भंडारा जिल्ह्यात वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी अनेक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांच्या बदल्याही नियमानुसारच करण्यात येत आहे. या बदली प्रक्रियेदरम्यान जे बदलीस पात्र आहेत त्याच शिक्षकांना बोलाविण्यात आले आहे. ही प्रक्रिया सुरळीत चालावी, यासाठी पोलीस असले तरी त्यांच्यापासून कुणालाही त्रास नाही. शिस्त पालनासाठी पोलीस यंत्रणा काम करीत आहे. ही बदली प्रक्रिया न्यायपूर्ण पद्धतीनेच होत आहे. जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले. त्यानुसार ६ ते १३ मे या कालावधीत बदल्या होत आहेत. ही प्रक्रिया जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होत आहे. ११ मे रोजी सकाळी १० पासून शिक्षण विभाग (माध्यमिक), १२ व १३ मे शिक्षण विभाग (प्राथमिक) असे बदल्यांचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. बदल्या करताना नक्षलग्रस्त भागात तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यरत कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात आला आहे. सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षापेक्षा अधिक काळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रशासकीय दृष्टिने बदली करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार विनंती बदली करण्यात येत आहे. पक्षघाताने आजारी, अपंग, हदयरोग, किडणीरोग, कर्करूग्ण, सैनिकांची पत्नी, विधवा, घटस्पोटीत, परित्यक्त्या, वयाचे ५३ वर्ष पूर्ण करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना विनंती बदली करताना अट शिथील करण्यात आली आहे. प्रशासकीय बदलीतही सवलत देण्यात आली आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची अंतिम यादी तयार करण्यापूर्वीही आक्षेप मागविण्यात येणार आहे. त्यानंतरच अंतिम यादी सूचना फलकावर लावण्यात येणार असल्याचेही राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
न्यायानुसारच बदली प्रक्रियेला प्राधान्य
By admin | Published: May 14, 2016 12:28 AM