शिक्षक कृती समितीशी चर्चा : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे आश्वासनभंडारा : जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांसाठी शिक्षक कृती समितीने भंडारा जिल्हा परिषदेसमोर ६ आॅक्टोबरला सामूहिक रजा आंदोलन व साखळी उपोषण केले. या अनुशंगाने राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी कृती समितीची चर्चा झाली. यात तावडे यांनी शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. जिल्हा परिषद शिक्षक कृती समितीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन करून प्रशासनाला हादरवून सोडले. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने शिक्षकांच्या समस्यांचे निवेदन स्विकारले नाही. याचा निषेध म्हणून शिक्षक कृती समितीने ७ आॅक्टोबरला साखळी उपोषण सुरू केले. याची दखल घेत खा. नाना पटोले, आ. चरण वाघमारे यांनी शिक्षकांच्या समस्या ऐकल्या व मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. अहिरे यांच्या मार्फत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले.दरम्यान आ. चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शिक्षक कृती समितीच्या शिष्टमंडळाची राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मंगळवारला मुंबईत भेट घेतली. दरम्यान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनाही शिक्षक कृती समितीने समस्यांचे निवेदन दिले. यावेळी विनोद तावडे यांनी शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर सविस्तर चर्चा केली. यात सन २००५ नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करणे, इयत्ता ६ ते ८ च्या पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी मंजूर करणे, स्थानांतरीत कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करणे, केंद्र प्रमुखांची पदे अभावितपणे भरणे, शिक्षक संवर्गातील रिक्त पदे तात्काळ पदोन्नतीने भरणे, जि.प. शाळांमधील विद्युत देयके शासनाने भरावे, चार टक्के साधील अनुदान देणे, मे २०१६ मध्ये झालेल्या अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देवून सुधारित आदेश देणे, जि.प. माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक आणि पदवीधर विषयी शिक्षकांची पदे त्वरीत भरण्यात यावी, वरिष्ठ श्रेणी मंजुर करून निवड श्रेणीमधील जाचक अटी रद्द करणे, शालेय पोषण आहार शिजविणारे महिलांचे मानधन पाच हजार करून ते दर महा द्यावे, सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविणे, अतिथी निदेशकांना नियमाप्रमाणे मानधन द्यावे, घड्याळी तासीका शिक्षकांचे मानधन दर महा द्यावे आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली. या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे निर्देश विनोद तावडे यांनी अधिनस्त अधिकाऱ्यांना दिले.यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी (शिक्षण) स्वप्नील कापडनीस, उपसचिव (शिक्षण) राजेंद्र पवार, विशेष कार्यकारी अधिकारी प्राची साठे, शिक्षक कृती समितीचे मुबारक सय्यद, रमेश सिंगनजुडे, ओमप्रकाश गायधने, ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, युवराज वंजारी, गिरीधारी भोयर, सुधीर वाघमारे, मुकूंद ठवकर, संदीप वहिले, हरिकिसन अंबादे, सुधाकर ब्राम्हणकर, रमेश पारधीकर, प्रमोद घमे आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
शिक्षकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2016 12:28 AM