भंडारा : गत दाेन महिन्यांपासून एसटीचा संप सुरू असल्याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांनी घेतला असून भंडारा-नागपूर मार्गाचा तर ट्रॅव्हल्स मालकांनी जणू कब्जाच घेतला आहे. दर अर्ध्या तासाला नागपूरसाठी ट्रॅव्हल्स सुटत असून आरटीओ कार्यालयापासून त्रिमूर्ती चाैकापर्यंत एकाचवेळी सात ते आठ ट्रॅव्हल्स उभ्या असतात. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची भीती असते.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबर २०२१ पासून संप पुकारला आहे. त्यामुळे एसटी बससेवा ठप्प झाली. अलीकडे तुरळक बसफेऱ्या सुरु आहेत परंतु प्रवाशांच्या तुलनेत त्या अत्यल्प आहे. याच बाबीचा फायदा आता खासगी प्रवासी वाहतूकदारांनी घेतला आहे. संपापूर्वी एकही ट्रॅव्हल्स भंडारा- नागपूर धावताना दिसत नव्हती; परंतु आता दीड महिन्यापासून ट्रॅव्हल्सच्या संख्येत चारपटीने वाढ झाली आहे. आरटीओ कार्यालयापासून त्रिमूर्ती चाैकापर्यंत या ट्रॅव्हल्सचा ठिय्या असताे. एजंट प्रवाशांना जाेरजाेराने ओरडून बाेलावत असतात. मिनीडाेअर अथवा इतर वाहनातून प्रवासी आले की है क्या नागपूर असा आवाज देत चक्क त्यांच्याजवळील बॅगा घेऊन ट्रॅव्हल्समध्ये नेऊन ठेवतात.
नाईलाज असल्याने प्रवाशांना या खासगी वाहनातून प्रवास करावा लागताे. तिकिटाचे दरही दुप्पट करण्यात आले आहेत. दाेन सीटवर तीन जण बसवून नेले जात असून काेराेना नियमांचेही उल्लंघन केले जात आहे. कुणीही प्रवासी मास्क लावलेला दिसत नाही. एवढेच काय चालक आणि एजंटही मास्क लावलेले नसतात.
थेट ट्रॅव्हल्ससाठीही गर्दी वाढली
भंडारा येथून रायपूर, गाेंदिया, पुणे, औरंगाबाद, अमरावती येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही माेठी आहे. एसटीच्या संपानंतर ट्रॅव्हल्समध्ये माेठी गर्दी वाढली आहे. त्रिमूर्ती चाैकात यामुळे बुकिंग काउंटरही वाढल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी प्रवासी बुकिंग करुन प्रवाशाला निघतात.
राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची भीती
प्रवासी मिळविण्यासाठी दिवसभर आरटीओ कार्यालय ते त्रिमूर्ती चाैकापर्यंत ट्रॅव्हल्स धारकांचा गाेंधळ सुरु असताे. शहरातून जाणाऱ्या मार्गावर माेठी गर्दी असते. नेहमी वाहतुकीची काेंडी हाेते. आता तर या ट्रॅव्हल्स कुठेही उभ्या केल्या जात असल्याने गर्दी वाढली आहे. वाहतुकीची काेंडी हाेऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.