भंडारा :एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने सध्या सर्व बसेस बंद आहेत. याचा फायदा घेत खासगी वाहतूक करणाऱ्या प्रवासी गाड्यांकडून प्रवाशांची प्रचंड लूट भंडारा पवनी मार्गावर सुरू आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी अनेक प्रवाशांनी केली आहे.
अनेक दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप विलीनीकरणाच्या मागणीसह सुरू आहे. राज्य शासनाने ४० टक्के पगारवाढ देऊनही विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी अडले आहेत. त्यामुळे प्रवास करणाऱ्या लोकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. दवाखाना, सरकारी कामे, तसेच इतर कामानिमित्त जनतेला भंडारा, नागपूर व इतर ठिकाणी जावे लागते. त्याचा फायदा घेत, खासगी प्रवासी वाहतूक करणारे लहान-मोठ्या गाड्यांत प्रवासी कोंबून बसवून प्रवाशांची प्रचंड लूट करीत आहेत.
भंडारा पवनी लहान-लहान खासगी वाहने, टाटा सुमो आणि इतर गाड्या सुरू आहेत. यातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा भरणा करून त्यांची ने-आण केली जात आहे. तर, तिकीटांचे बघायचे झाल्यास कोंढा ते भंडारा १०० रुपये, कोंढा ते पवनी ३० रुपये, अड्याळ ते भंडारा ७० रुपये प्रवासाचे रुपये घेतले जात आहे. तिकीट दर येवढे नसताना लोकांकडून प्रवासाचे दुप्पट दर घेतले जात आहेत.
पवनी ते नागपूर १५० रुपये, भंडारा ते नागपूर २०० रुपये प्रवाशांकडून वसूल केले जात आहे. यामुळे याचा ताण गरीब सामान्य माणसाला पडत आहे. दवाखान्यानिमित्त किंवा सरकारी कामानिमित्त, इतर आवश्यक कामासाठी येणे-जाणे करावे लागते. दरवाढीचा नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे. खासगी वाहतूक दर यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे, तसेच राज्य सरकारने परिवहन महामंडळाच्या कर्मचारी यांच्या मागण्या त्वरित मान्य करण्याची मागणी लोकांनी केली आहे.