चुल्हाड (सिहोरा) : बावनथडी व वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या बपेरा गावात १२५ कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी या वसाहतीत समस्याच समस्या निर्माण झालेल्या आहेत. शौचालयाची टाकी ओव्हरफ्लो झाली आहे, तर छत गळत असल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. अन्य सुविधांसाठी नागरिक त्रस्त झाले आहेत. शासनाने पुनर्वसित नागरिकांना मदतीचा हात देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वैनगंगा, बावनथडी नदीच्या संगम तिरावर असलेल्या अडीच हजार लोकवस्तीच्या बपेरा गावाने नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याची झळ सोसली आहे. गावांतील ८५ हेक्टर आर शेती नदीच्या वाढत्या पात्राने गिळंकृत केली आहे. शेतशिवारात असणाऱ्या विहिरी कवेत घेतल्या आहेत. गावातील शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे. अनेक सधन शेतकरी शेतमजूर झाले आहेत. नैसर्गिक आपत्ती गावकऱ्यांवर कोसळली असताना तत्कालीन युती शासनाच्या काळात शेतकऱ्यांना छदामही मिळाला नाही. शेतकऱ्यांना शेतसारा माफी देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार करण्यात आला आहे. दरम्यान, गावात नद्यांचे पाणी शिरत असल्याने प्रचंड नासाडी गावकऱ्यांनी अनुभवली आहे. गावांच्या पुनर्वसनासाठी गावकऱ्यांनी मोठा संघर्ष केला आहे. पुनर्वसनासाठी करण्यात आलेले २४ तासांचे रास्ता रोको आंदोलन जगजाहीर आहे. यानंतर युती शासनाच्या काळात दोन टप्प्यांत गावातील पुनर्वसनाला मंजुरी देण्यात आली आहे. २००७ मध्ये शहरी पॅटर्न अंतर्गत १२५ कुटुंबीयांच्या पुनर्वसनाला मंजुरी देण्यात आली होती. गावांच्या शेजारी जमिनीचे अधिग्रहण करण्यात आल्यानंतर घरांचे बांधकाम करण्यात आले होते. लॉटरी पद्धतीने घरांचे हस्तांतरण करण्यात आले आहे. परंतु हेच घराचे बांधकाम वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या जिव्हारी लागले आहे. अवघ्या १३ वर्षांत छतातून पाणी गळत आहे. छताचे सिमेंट कोसळत असून छत कधी कोसळेल याचा नेम नाही. यामुळे पुनर्वसित घरात जीवघेणा प्रवास सुरू झाला आहे. याच पुनर्वसित घरांत शौचालयाच्या पाइपमध्ये गडर देण्यात आले आहे. स्वतंत्र खड्डे खोदकाम करण्यात आले नाही. शहरी पॅटर्न असल्याने कुणी विरोध केला नाही. ही गडर ओव्हरफ्लो झाली आहेत. याच वसाहतीत वीजपुरवठा खंडित आहे. रानडुकरांची भीती नागरिकांना सतावत आहे. रात्री कुणी घराबाहेर पडत नाहीत. ग्राम पंचायत या वसाहतीत सुविधा पुरवायला गेले तर निधी नाही. निधीअभावाचे रोष पदाधिकाऱ्यांवर येत आहेत.
बॉक्स
१६९ नागरिकांचे पुनर्वसन अडले
बपेरा गावात दोन टप्प्यांत पुनर्वसनाला मंजुरी देण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात १२५ कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. उर्वरित कुटुंबीयांचे अडले आहे. पुनर्वसनाच्या हालचालींना वेग देण्यात आला नाही. जी घरे उर्वरित पुनर्वसन यादीत आहेत अशा घरांत गेल्या वर्षात पाणी शिरले होते. परंतु कुणी बोलले नाही. उर्वरित पुनर्वसन करण्यासाठी मुंबई दरबारात असणाऱ्या फाइलवरून धूळ काढण्याचे प्रयत्न झाले नाहीत. यामुळे उर्वरित पुनर्वसन बेदखल झाले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी उर्वरित पुनर्वसन कार्याची दखल घेण्याची गरज आहे.
बॉक्स
शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा
बावनथडी नदीच्या पात्रात गावातील ८५ हेक्टर आर शेती गेली आहे. बागायती शेती गेल्याने शेतकऱ्यांनी डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. नैसर्गिक आपत्ती असताना शासनाची मदत मिळाली नाही. युती, आघाडी, महाविकास आघाडी असा प्रवास गावातील शेतकऱ्यांनी अनुभवला आहे. परंतु लोकप्रतिनिधींनी मनावर घेतले नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरपंच ममता राऊत यांनी पत्रव्यवहार केला आहे.