लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख ८८ हजार क्विंटल उन्हाळी धानाची खरेदी आधारभूत किमत खरेदी केंद्रावर करण्यात आली आहे. आठ ७३३ शेतकऱ्यांनी आपला धान विकला आहे. जिल्ह्याला आठ लाख ६९ हजार क्विंटल खरेदीची मर्यादा देण्यात आली आहे. त्यामुळे रबीतील संपूर्ण धान खरेदी हाेण्याची सुतराम शक्यता नाही.भंडारा जिल्ह्यात खरीप आणि उन्हाळी हंगामात धानाची लागवड केली जाते. यावर्षी शेतकऱ्यांनी मुबलक पाणी असल्याने माेठ्या प्रमाणात उन्हाळी हंगामात धानाची लागवड करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांचा धान घरी आला आहे. मात्र धान खरेदीच्या मर्यादेने सर्वत्र संभ्रम निर्माण झाला हाेता. मध्यंतरीच्या काळात धान खरेदी ठप्प झाली हाेती. धान खरेदीची मर्यादा चार लाख क्विंटलवरुन आता आठ लाख ६९ हजार क्विंटल करण्यात आली. त्यामुळे धान खरेदीला वेग आला आहे.जिल्ह्यातील नाेंदणीकृत ८ हजार ३३ शेतकऱ्यांनी आतापर्यंत तीन लाख ८८ हजार ६४० क्विंटल धानाची विक्री केली आहे. हमीभाव १९४० नुसार या धानाची किंमत ७५ काेटी ३९ लाख ६२ हजार ८५ रुपये आहे. सध्या धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन पाेर्टलवर खरेदी केली जात आहे. आधारभूत केंद्राला दिलेल्या उद्दिष्टाएवढी खरेदी झाल्यावर आपाेआपच खरेदी बंद हाेणार आहे. सपूर्ण धान खरेदी हाेणार नसल्याने शेतकरी कायम चिंतेत आहे. आता खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याशिवाय पर्याय नाही.
विकलेल्या धानाच्या पैशाची प्रतीक्षा- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी माेठ्या आशेने आधारभूत केंद्रावर धानाची विक्री केली. तीन लाख ८८ हजार ६४० क्विंटल धान शेतकऱ्यांनी आतापर्यंत विकले आहे. त्याची किंमत ७५ काेटी ३९ लाख ६२ हजार ८८५ रुपये यापैकी एक छदामही अद्यापपर्यंत मिळाला नाही.१५८ केंद्रावर खरेदी- उन्हाळी धान खरेदीसाठी पणन महासंघाने १९० केंद्राना मंजुरी दिली. त्यापैकी प्रत्यक्षात १५८ खरेदी केंद्र सुरु झाले आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची आता गर्दी हाेत आहे. मात्र गाेदामाची समस्या कायम आहे.