पानावली हिरवीगार झाडे : वृक्षांचे संवर्धन, लोकसहभागमोहाडी : तहसील कार्यालयाच्या पाठीमागे पडीक जमिनीचा मोठा पसारा होता. जनावरांचा प्रचंड हैदोस चालत होता. पडीक जमिनीचा विकास व्हावा यासाठी प्रशासनीक अधिकारी तहसीलार यांनी प्रोजेक्ट ग्रीन ची संकल्पना मांडली. संकल्पना वास्तवात साकारली गेली. सात महिन्यातच तिथे हिरवीगार झाडे उभी आहेत. वरदान ठरलेली ओसाड पडीक जागा वृक्षसंवर्धनाने रमणीय बनली आहे.प्रशासनातील कामाचा पसारा. यातून वेळ काढून समाजहितोपयोगी कामे करणे कठीणच. तथापि, सामाजिक जाण व सकारात्मक दृष्टी ठेवणारे, वेगळेपण जपण्याची प्रबळ इच्छा असेल तर सगळं शक्य होते. असा आदर्श उभा केला मोहाडी तहसीलदार धनंजय देशमुख यांनी. तहसील कार्यालयाच्या अगदी पाठीमागे विस्तीर्ण अशी पडीक जागा होती. ओसाड असलेली ही जागा जनावरांचा कुरण बनली होती. तहसीलच्या चारही दिशेने कोणालाही आत प्रवेश करणे सोपे होते. तहसील परिसरातील प्रसन्नता हरविली होती. पण या पडीक अन् ओसाड जागेवर नंदनवन फुलवण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या तहसीलदारांनी प्रोजेक्ट ग्रीनची संकल्पना जनतेसमोर मांडली. दानशूर जनतेनी हात मोकळे करून सहभाग करण्याचा मानस व्यक्त केला. तहसीलदार धनंजय देशमुख व लोकजनांच्या मदतीमुळेच आज मोहाडी येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात पानावलेली हिरवीगार झाडे उभी दिसून येत आहेत. तहसीलदारांच्या प्रोजेक्ट ग्रीनच्या संकल्पनेची जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी प्रशंसा केली होती. केवळ प्रशंसाच नाही तर त्यांनी वेळ काढून प्रोजेक्ट ग्रीनला भेट दिली. त्यांनी स्वत: वृक्ष लावले. त्याच्यासोबत शिक्षण आयुक्त धीरजकुमार, सचिव दीपक कपूर, मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर या प्रशासनीक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी प्रोजेक्ट ग्रीनमध्ये पाय ठेवीत वृक्ष लागवडही केली. त्यामुळे मोहाडी येथील तहसील परिसरातील प्रोजेक्ट ग्रीन खास बनला आहे. लोक प्रतिनिधीसह सामान्य लोकांच्या मुंगीभर हातभाराने हा प्रोजेक्ट ग्रीन साकारला गेला आहे. लावलेल्या वृक्षाचे काळजीने संवर्धन केले जात आहे. आज स्थितीत या प्रोजेक्ट ग्रीनमध्ये बाराशेच्या आत झाडे उभी आहेत. यात वेगवेगळ्या प्रजातीची आंब्याची झाडे, चिकू, पेरू, छत्तीसगडवरून आणलेली अॅपल बोर, शेवगा आदी चाळीस प्रकारच्या प्रजातीची झाडे पानावली आहेत. वृक्षसंवर्धन करण्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक झाडाला सिंचन व्हावे यासाठी ठिबकची सोय झाली. त्यामुळे प्रत्येक वृक्ष जगणार आहे. पडीक जमिनीचा विकास वृक्ष लागवडीने करण्यात आला आहे. प्रोजेक्ट ग्रीन नियोजनबद्ध विकास करण्यात येत आहे. शेवगा व फळाच्या वृक्ष लागवडीतून शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे, संपन्न व्हावे यासाठी हा प्रोजेक्ट प्रेरणादायी ठरणार आहे. (तालुका प्रतिनिधी)अनेक हातांनी प्रोजेक्ट ग्रीन संकल्पना साकार करण्यासाठी हातभार लावला. वृक्ष संवर्धनाची प्रेरणा यातून येणाऱ्यांना मिळेल. प्रामाणिक हेतू असेल लोकसहभाग मिळतो त्याचे प्रत्यय आले आहे.- धनंजय देशमुख,तहसीलदार, मोहाडी.
पडीक जमिनीला वरदान ठरली प्रोजेक्ट ग्रीन संकल्पना
By admin | Published: March 13, 2017 12:28 AM