लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा गौण खनिजांच्या बाबतीत संपन्न आहे, मात्र या संपत्तीला तस्करांची चांगलीच कुदृष्ट लागली आहे. जिल्ह्यातील गौण खनिजांच्या वाहतुकीत तस्करांचा बोलबाला असून रेती, मुरूम, बोल्डर व मातीसह अन्य खनिजांची खुलेआम चोरी सुरू आहे. शासकीय नियमांना डावलून गौण खनिजांची चोरी होत असताना जिल्हा खनिकर्म विभागात मात्र सर्व आलबेल दिसून येते. अधिकाऱ्यांचे खिसे दरमहा लक्षावधी रुपयांनी गरम होत असल्याने कारवाई नावापुरतीच आहे.भंडारा जिल्ह्याला रेतीच्या रूपाने मोठे वरदान मिळाले आहे. अख्ख्या महाराष्ट्रात वैनगंगा व बावनथडी नदीची रेती गुणवत्तेत उच्च दर्जाची आहे. रेतीवरच तस्करांचा मोठा डोळा असतो. यामुळे फक्त पावसाळ्याचे काही दिवस वगळता बाराही महिने रेतीसह अन्य गौण खनिजांची खुलेआम वाहतूक सुरू असते. पोलिसांसह महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वेळेवर पैशाची पोटली पोहोचत असल्याने कारवाई नावापुरती होत आहे.एकट्या जिल्हा खनिकर्म विभागाच्या कारवायांवर नजर घातल्यास गत दोन वर्षांत डझनभरपेक्षा जास्त कारवाई दिसून येत नाही. उंटावरून शेळ्या हाकणे आणि कारवाईच्या थापा मारण्यातच या विभागाने मजल गाठली आहे. ठरविलेला पैसा वेळेवर पोहोचत असल्याने तस्करांसाठी रान मोकाट आहे. कोणीही या आणि गौण खनिजांची चोरी करून जा, असा प्रकार पाहावयास मिळत आहे. इमानेइतबारे तस्करांवर कारवाई करणारेही कधीकधी अडचणीत सापडत आहेत. भंडारा, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखांदूर तालुक्यांतही तस्करांचे प्राबल्य दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या संपूर्ण प्रकाराला आळा बसविण्यासाठी जिल्हा प्रशासन सपशेल अयशस्वी ठरले आहे.
ड्रोन कॅमेऱ्याची योजना थंडबस्त्यातघाटांमधून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असताना जिल्हा प्रशासनाने जवळपास दोन वर्षांपूर्वी या घाट परिसरात ड्रोनद्वारे निगराणी ठेवण्यात येईल, असा निर्णय घेतला होता. मात्र ही योजना कुठे बारगळली माहीत नाही. ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने जिल्ह्यातील मुख्य रेती घाटांवर नजर ठेवल्यास शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल चोरी होण्यापासून बचाव होऊ शकतो. परंतु अधिकाऱ्यांचे चांगभले होत असताना ‘आपण सर्व भाऊ भाऊ, रेतीचा पैसा मिळून खाऊ’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. आता पाऊस संपला असून, रेती तस्करांचे मनसुबे पुन्हा वाढले आहेत. इमानेइतबारे घाटांचा लिलाव करून दोन पैसे कमावणाऱ्यांपेक्षा चोरी करणाऱ्या तस्करांचे मात्र चांगलेच फावत आहे.
धास्ती भरवा, लयलूट करा महिन्यातून दोन ते चार वेळा तालुका तहसील प्रशासनाकडून गौण खनिजांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. वेळप्रसंगी कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याच्याही घटना घडल्या आहेत. कधीकधी डॅशिंगपणे केलेल्या कारवाईत तस्करांचे धाबे दणाणते. परंतु दुसऱ्या दिवसापासून पुन्हा गौण खनिजांची लयलूट केली जाते. ‘धास्ती भरवा आणि लयलूट करा’ असाच हा प्रकार आहे काय? असेही बोलले जात आहे.