लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारताेफा रविवारी रात्री थंडावल्या असून, आता साेमवारी उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर देणार आहे. मंगळवारी प्रत्यक्ष मतदान हाेणार आहे. जिल्ह्यातील ३९ गट आणि ७९ गणांमध्ये अटीतटीची लढत हाेत असून, काेण बाजी मारणार, याची गावागावांत चर्चा सुरू आहे.जिल्हा परिषदेच्या ३९ जागांवर २४५ उमेदवार आपले भाग्य आजमावित आहेत. त्यात १३६ पुरुष तर १०९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. पंचायत समितीच्या ७९ जागांसाठी ४१७ उमेदवार असून, त्यात २२८ पुरुष तर १८९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक चिन्ह वाटपापासून प्रचाराला प्रारंभ झाला; मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून निवडणूक हाेणार की नाही, अशी शंका हाेती. शुक्रवारी निवडणूक हाेणार, हे निश्चित झाल्यावर खऱ्या अर्थाने प्रचाराला प्रारंभ झाला. प्रत्येक उमेदवाराने आपल्या मतदार संघात गावाेगावी जावून आपली भूमिका पटवून दिली. प्रचारासाठी राज्यस्तरीय नेत्यांच्या सभा आयाेजित करण्यात आल्या. रविवारी, रात्री १२ वाजता या प्रचारताेफा थंडावल्या; मात्र दिवसभर ठिकठिकाणी नेत्यांच्या सभा झाल्या. प्रचारताेफा थंडावल्या असल्या तरी साेमवार हा एक दिवस उमेदवारांच्या हाती असल्याने मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर दिला जाणार आहे.जिल्ह्यात सर्वच गट आणि गणात अटीतटीची लढत हाेत आहे. काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चाैरंगी लढतीचे चित्र आहे. अपक्षांनीही या निवडणुकीत रंगत आणली असून, तिकीट न मिळाल्याने बंडखाेरी करणारे उमेदवार पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी डाेकेदुखी ठरत आहे. त्यांना थांबविण्याचा वरिष्ठांकडून प्रयत्न करण्यात आला, तरी ते ऐकण्याच्या तयारीत नाही. काेण बाजी मारणार, यावर चर्चा सुरू आहे.
६६२ उमेदवार, पाच लाख ९४ हजार मतदार- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात ६६२ उमेदवार आहेत. त्यात जिल्हा परिषदेचे २४५ तर पंचायत समितीच्या ४१७ उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांचे भवितव्य पाच लाख ९४ हजार ४५३ मतदारांच्या हाती आहे. तीन लाख एक हजार १७० पुरुष तर दाेन लाख ९३ हजार २८३ महिला मतदार आहेत. मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे माेठे दिव्यही उमेदवारांना पार पाडावे लागणार आहे.
निवडणूक निरीक्षकांकडून पाहणी- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक अनिल पाटील यांनी जिल्ह्यातील मतदान केंद्रांची पाहणी केली. यासाेबत स्ट्राँग रूमचीही पाहणी केली. तुमसर येथे भेट दिली असता, त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी हरीश भांबरे उपस्थित हाेते.