लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या ३८ जागांसाठी १९८ उमेदवार रिंगणात असून मंगळवार १८ जानेवारी रोजी मतदान होत आहे. गत सात दिवसांपासून सुरु असलेली प्रचाराची रणधुमाळी रविवारी सायंकाळी संपली असून आता उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर देत आहेत.सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली. तसेच या जागा सर्वसाधारण करुन निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे मागास प्रवर्गातील जिल्हा परिषदेच्या १३ गटातील आणि पंचायत समितीच्या २५ गणातील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. आता ही निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होत आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या २५ जागांसाठी १३१ उमेदवार रिंगणात आहेत. ३८ जागांसाठी ही निवडणूक होत असून १९८ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला १८ जानेवारी रोजी होत आहे. तुमसर तालुक्यातील चुल्हाड, सिहोरा, गर्रा या तीन गटांसाठी १३ उमेदवार, मोहाडी तालुक्यातील कांद्री, डोंगरगाव, वरठी गटांमध्ये १५ उमेदवार, लाखनी तालुक्यातील लाखोरी, मुरमाडी, सावरी, केसलवाडा वाघ आणि मुरमाडी तुपसर या चार गटांसाठी २२ उमेदवार, भंडारा तालुक्यातील एकमेव सिल्ली गटात सहा उमेदवार तर पवनी तालुक्यातील ब्रम्ही व भुयार गटात ११ उमेदवार रिंगणात आहेत. गत सात दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होती. मात्र कोरोना संसर्गामुळे उमेदवारांना प्रचार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रविवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस असला तरी उमेदवारांना रॅली काढताना अडचणींचा सामना करावा लागला. आता एक दिवस उमेदवारांच्या हाती असून विजयासाठी प्रत्यक्ष गाठीभेटी घेणे सुरु केले आहे. सर्वांच्या नजरा आता मतमोजणीच्या दिवसाकडे लागल्या आहेत.
१९ जानेवारीला एकत्र मतमोजणी- दोन टप्प्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी १९ जानेवारी रोजी होत आहे. मतमोजणीसाठी निवडणुक यंत्रणा सज्ज झाली असून सातही तालुकास्थळी मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
उमेदवारांसाठी सोमवारची रात्र महत्वाची - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी सोमवारची रात्र महत्वाची ठरणार आहे. १८ जानेवारी रोजी मतदान होत असल्याने सोमवारी रात्रीपर्यंत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न राहणार आहे.