इंद्रपाल कटकवार
भंडारा : जिल्ह्यात गुन्ह्यांचा आलेखामध्ये घरफोडीचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात दिसून येते. विशेष म्हणजे लाखोंची मालमत्ता घरात असताना नागरिक मात्र शंभर रुपयांचे कुलूप लावून मोकळे होत असतात. अशातच चोरट्यांचे फावते. गत वर्षभरात घरफोडीच्या ११५ घटना घडली असून त्या माध्यमातून ८४ लक्ष लक्ष ६१ हजार रुपयांचा सोन्याचांदीच्या ऐवजांसह अन्य साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे. कमी किमतीचे कुलूप लावून सुरक्षेची हमी नागरिक व्यक्त करीत असतात मात्र तसे होताना दिसून येत नाही.
जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत वर्षी घरफोडीच्या घटनांमध्ये कमी दिसून येते. सन २०१९ मध्ये घरफोडीच्या १३६ घटना घडल्या होत्या. यावर्षी घरफोडीच्या ११५ घटना घडल्या आहेत. बाजारपेठेत विविध प्रकारचे कुलूप उपलब्ध आहेत.
सध्या पॅड लॅाक्स, नॉब लॅाक्स आणि कॅम लॅाक्स तसेच सेंटर लॉक अधिक वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातही लहान कुलपापासून ते दणकट कुलूपांची मागणी जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते.
विशेषतः भंडारा शहरात ८०० रुपयांपर्यंतचे महागडे कुलूप विकले जातात. तसेच १५ रुपयांपासून साधारण कुलूप ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. भंडारा शहरात नेमक्या ठिकाणी कुलूप विक्रीची दुकाने आहेत. कमी किमतीचे कुलूप लावून नागरिक घराच्या सुरक्षा व्यवस्थेवर विसंबून असल्याचे दिसून येतात.
एखाद्या घरी चौकीदार किंवा रक्षक नसल्यास चोरट्यांचे चांगलेच धावत असते लहान कुलूप फोडण्यात चोरट्यांना तेवढा श्रम करावा लागत नाही. दिवसापेक्षा रात्रीला घरफोडीच्या घटना अधिक आहेत.
यात दिवसा १८ तर रात्रीला ९३ घटना घडल्या आहेत. मात्र दणकट किंवा सेंटर लॉक उघडण्यात जास्त वेळ लागतो, असे कारागिरांनी सांगितले. आधुनिकीकरणासोबत कुलूप बनविण्याचे व त्या प्रमाणात विक्रीसाठी ही बाजारपेठेत उपलब्ध आहेत. मोठ्या शहरांमध्ये मोठ्या दणकट स्वरूपाच्या कुलूपांना मागणी असल्याचे या कारागिरांनी सांगितले.
वर्षभरात झाल्या ११५ घरफोड्या
यावर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२० पर्यंत जिल्ह्यात घरफोडीच्या ११५ घटना घडल्या आहेत. यात घरफोडीतून आतापर्यंत ८४ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. दिवसापेक्षा रात्रीला घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. नोव्हेंबर पर्यंतच्या आकडेवारीवर नजर घातल्यास एकूण घरफोडीच्या १११ घटना घडल्या. त्यापैकी ३८ घटना उघडकीला आल्या आहेत. घटनेतील ९ लक्ष ८० हजार ८३२ रुपयांचे साहित्य परत प्राप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.