लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्रत्येकाचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. केंद्र सरकार व राज्य शासनाने ग्रामीण भागातील गरजूंना घर देण्याचा संकल्प केला जरी असला तरी प्रत्यक्षात मात्र घरकुल लाभार्थ्यांच्या पदरी निराशा पडत आहे. तुमसर तालुक्यात रमाई आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत ५०० घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते.
परंतु केवळ १०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. लाभार्थी निवड योजनेचे प्रमुख हे पालकमंत्री असतात. येथे रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे घरकुलांचे केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न येथे उपस्थित होतो. तुमसर तालुक्यात पंचायत समितीमार्फत रमाई आवास योजना ग्रामीण लाभार्थ्यांची यादी समाज कल्याण आयुक्तांकडे पाठविण्यात आली होती. त्या यादीला २०२३-२०२४ मध्ये मंजुरी देण्यात आली. यात ५०० लाभार्थ्यांची यादी संबंधित विभागाकडे पाठवण्यात आली होती. त्यापैकी केवळ १०० लाभार्थ्यांची यादी मंजुरी प्राप्त झाली आहे. सहायक आयुक्त समाज कल्याण भंडारा यांच्या कार्यालयामार्फत ते मंजूर करण्यात आली. पालकमंत्री या समितीचे प्रमुख असतात. हे विशेष.
भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुका हा सर्वात मोठा तालुका असून ग्रामीणकरिता रमाई आवास योजना असून येथे अनुसूचित जातींच्या लाभार्थ्यांची निवड या रमाई आवास योजनेअंतर्गत करण्यात येते. केवळ १०० लाभार्थ्यांची येथे निवड करण्यात आली. उर्वरित ४०० लाभार्थी अजूनही घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. त्या गरजू लाभार्थ्यांचे घरांचे स्वप्न कधी पूर्ण होणार का, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांमध्ये येथे असंतोष दिसून येत आहे. सदर प्रस्ताव तयार करण्याकरिता लाभार्थ्यांना अनेक दिवस शासकीय कार्यालयांची पायपीट करावी लागली. प्रस्ताव तयार करताना पैसा खर्च करावा लागला. श्रम व वेळ येथे अधिक खर्च केल्यानंतरही लाभार्थ्यात निराशाच पदरी पडली आहे. पुन्हा ४०० गरजू किती प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न येथे लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे. तुमसर तालुक्यात एकूण ९७ ग्रामपंचायती आहेत. त्यात मोठ्या गावातील एक किंवा दोनच लाभार्थ्यांची येथे निवड करण्यात आली आहे.
तुमसर तालुक्यात केवळ रमाई आवास योजनेअंतर्गत १०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. उर्वरित ४०० लाभार्थ्यांना घरकुलाची प्रतीक्षा करावी लागणार असून उंटाच्या तोंडात येथे जीरा घालण्याच्या प्रकार दिसून येत आहे. शासनाने उर्वरित गरजूंना तात्काळ घरकुल मंजूर न केल्यास लाभार्थ्यांसोबत जन आंदोलन करण्यात येईल.- हिरालाल नागपुरे, उपसभापती, पंचायत समिती, तुमसर.