भंडारा : बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन (पीसीव्ही) या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. पीसीव्ही लसीकरण करून मुलांमधील न्यूमोकोकल आजार व त्यामुळे होणारे मृत्यू टाळू शकतो. गंभीर न्यूमोकोकल आजार होण्याचा धोका २ वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतो. पीसीव्ही लसीकरणाने या गंभीर न्यूमोकोकल आजारापासून बालकांचे संरक्षण तर होईल त्यासोबतच समाजातील इतर घटकांमध्ये या आजाराचा धोका कमी होईल. बालकांना पीसीव्ही लसीच्या तीन मात्रा दिल्या जाणार असून, जन्मानंतर सहाव्या आठवड्यात, १४ व्या आठवड्यात आणि नवव्या महिन्यात लस दिली जाणार आहे. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी बॅक्टेरीयामुळे होणारा न्यूमोनिया हा आजार ५ वर्षांच्या आतील मुलांमधील न्यूमोनियाचे प्रमुख कारण आहे. न्यूमोकोकल न्यूमोनिया हा श्वसन मार्गाला होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे फुफ्फुसावर सूज येऊन त्यात पाणी भरू शकते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. या आजाराची प्रमुख लक्षणे खोकला, धाप लागणे इत्यादी आहेत. न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन (पीसीव्ही) या लसीच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण व नागरी भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तालुकानिहाय प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
न्यूमोनियाच्या संरक्षणासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:27 AM