नाना पटोले यांचे आवाहन : वन्यजीव सप्ताहाला प्रारंभभंडारा : मानव व वन्यजीव यांचा जवळचा संबंध आहे. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस जंगले ओसाड होत आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट कमी झाला आहे. वन्यप्राणी शिकाऱ्यांच्या नजरेत आहेत. अशा स्थितीत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. वन्यजीव सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे, भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा, साकोलीचे वनाधिकारी मनोहर गोखले, योगेश वाघाये, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम उपस्थित होते. भंडारा वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, भंडारा व नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, साकोली यांचे संयुक्त विद्यमाने भंडारा वन विभागाद्वारे वन्यजीव सप्ताह या कालावधीत साजरा करण्याचे अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रभातफेरी काढण्यात आली. सदर प्रभातफेरीला पोलीस अधीक्षक विनिता शाहू, उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. सदर रॅली उपवनसंरक्षक कार्यालयापासून निघून जयस्तंभ चौक, भंडारा बसस्थानक, गांधी चौक, महाल रोड, गंगा संकुल चौक, मुस्लिम लायब्ररी बौक, जे.एम. पटेल कॉलेज रोड, जयस्तंभ चौक, उपवनसंरक्षक कार्यालयात समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये विविध शाळेतील ८५० विद्यार्थी वन व वन्यजीव संबंधात स्लोगन असलेले फलक हाती घेऊन घोषणा देत होते. काही विद्यार्थी वन्यजीव वनसंवर्धन, पर्यावरण संबंधाने वेगवेगळी वेशभूषा धारण करून रॅलीत सहभागी झाले होते. तसेच काही विद्यार्थी वन व वन्यजीव संदर्भात फेस पेंटींग करून रॅलीत सहभागी झाले होते. त्या व्यतिरिक्त पथनाट्य, वृक्ष दिंडी पथक सहभागी झाले होते. या रॅलीत उपवनसंरक्षक, वनविभाग, उपसंचालक सामाजिक वनीकरण विभाग, उपसंचालक, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, साकोली, एन.जी.ओ प्रतिनिधी, सामाजिक संघटनेचे गणमान्य पदाधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, या विभागाचे कार्यालयीन व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीच्या समारोपानंतर विभागीय कार्यालय, वन विभागाचे परिसरात वन व वन्यजीवन संबंधी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाला खासदार नाना पटोले, आ. रामचंद्र अवसरे उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये अतिथीनी वृक्ष संवर्धनासंदर्भात तसेच पर्यावरण, वन्यजीव, वन्यजीव संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.सांस्कृतिक कार्यक्रम तथा प्रमुख अतिथींच्या मार्गदर्शनानंतर बक्षिस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये बेस्ट स्लोगन, बेस्ट ड्रेसींग व बेस्ट फेस पेंटींगकरिता विद्यार्थ्यांना वैयक्तिक तसेच प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येऊन गौरान्वित करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सहभागी प्रत्येक शाळेला तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. जनजागृतीच्या दृष्टीने वन व वन्यजीव संबंधाने प्रदर्शनी दाखविण्यात आली. (नगर प्रतिनिधी)
वृक्ष संवर्धनासह वन्यजीवांचे रक्षण करा!
By admin | Published: October 04, 2016 12:33 AM