लाेकमत न्यूज नेटवर्क
साकोली : लाखनी व साकाेलीच्या सीमेवर असलेल्या मुंडीपार सडक येथील भेल कारखाना सुरू करावा, या मागणीसाठी किसान गर्जनाच्या वतीने रविवारी आंदाेलन करण्यात आले. यात पाेलिसांनी वेळीच १६ जणांना अटक करून त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. आंदाेलनाचे नेतृत्व किसान गर्जनाचे अध्यक्ष राजेंद्र पटले व सरपंच संघटनेचे पवनकुमार शेंडे यांनी केले.
मुंडीपार सडक येथे स्थित भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) या आठ वर्षांपासून बंद असलेल्या कारखान्याला पुनर्जीवित करून काम सुरू करावे, या मागणीला घेऊन रविवारी किसान गर्जनाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यासंदर्भात आंदाेलन करण्यात आले. यासंदर्भात किसान गर्जनाने आंदाेलनाची माहितीही प्रशासनाला दिली हाेती. रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जवळपास १५० आंदाेलनकर्ते भेलसमाेर उपस्थित झाले. यावेळी पाेलिसांनी बळाचा वापर करीत आंदाेलनकर्त्यांना एकत्रित हाेऊ न देण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी आंदाेलनकर्त्यांपैकी १६ जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर चर्चेनंतर त्यांची सुटका करण्यात आली.
यावेळी साकाेली पाेलीस ठाण्याच्या पाेलीस कर्मचाऱ्यांसह उपविभागीय पाेलीस अधिकारी शिवाजी वायकर, तहसीलदार रमेश कुंभरे, लाखनी पाेलीस निरीक्षक मनाेज वाढीवे, पीएसआय रेवतकर, दंगाविराेधक पथक व हाेमगार्ड जवान उपस्थित हाेते.
बाॅक्स
...तर दाेन्ही जिल्ह्यांतील युवकांना राेजगार
भेल कारखाना सुरू केल्यास भंडारा व गाेंदिया जिल्ह्यातील बेराेजगार युवकांच्या हाताला काम मिळू शकेल. हा कारखाना सुरू हाेण्यापूर्वीच बंद पडला. आजही अनेक कामे व्हायची आहे. मात्र, लाेकप्रतिनिधी व शासनाच्या उदासीनतेमुळे कारखाना अजूनही सुरू झाला नाही, असे किसान गर्जनाचे अध्यक्ष राजेंद्र पटले यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले.