पालांदूर : गत आठवडाभरापासून कोविड रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हास्तरावर असलेल्या शासकीय व खासगी रुग्णालये फुल्ल झालेली आहेत. त्यामुळे तालुकास्तरावर व मोठ्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्ण सेवा पुरविण्याची मागणी ग्रामीण जनतेतून होत आहे.
सातही तालुक्यात ग्रामीण रुग्णालये आहेत. या ग्रामीण रुग्णालयात किमान तीस खाटांची व्यवस्था अपेक्षित आहे. या ठिकाणी कोरोना रुग्णांची तपासणी व आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्यास त्रास निश्चितच कमी होईल. गोरगरीब व्यक्तिंना स्थानिक ठिकाणी उपचार मिळून खर्चाची मोठी बचत होईल. लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आरोग्य व्यवस्था सुदृढ करणे नितांत गरजेचे झाले आहे.
ग्रामीण रुग्णालयानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. याही ठिकाणी मनुष्यबळ वाढवत कोरोना उपचार केंद्र सुरू करावे, औषधांचा मुबलक साठा, मनुष्यबळ व इतर आरोग्य सुविधा ग्रामीण स्तरावर आरोग्य केंद्राच्या ठिकाणी उपलब्ध करून गोरगरीब व्यक्तिंना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामीण भागातील जनतेने केली आहे. गरिबी असल्याने कित्येक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. अशा कठीण प्रसंगात शासन व प्रशासनाने गोरगरिबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. पालांदूर येथे ग्रामीण रुग्णालयाची वास्तू उभी आहे. पालांदूरशी अनेक गावांचा रोजचा संपर्क येतो. या इमारतीत कोविड सेंटर सुरू केल्यास ग्रामीण जनतेला दिलासा मिळेल. तेव्हा सरकारने ग्रामीण भागात कोविडच्या संकटात ठिकठिकाणी आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.