: महाराष्ट्र कुक्कुटपालन संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. फोटो १२ लोक ०८ के
लाखांदूर : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला जात आहे. मात्र कधी कोरोना सन्सर्गाचा धोका तर सध्या बर्ड फ्लू आजाराची अफवा निर्माण केली जात असल्याने सदर व्यवसाय बंद पडून आर्थिक नुकसानीचा संभाव्य धोका असल्याने सबंधित व्यावसायिकांना ५० लाखांची मदत द्या अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदर इशारा ११ जानेवारी रोजी लाखांदूर तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
लाखांदूर तालुक्यातील काही शेतकरी शेतीला पूरक म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय करीत आहेत. मात्र गतवर्षी कोरोना आजाराच्या भयावह परिस्थितीत कुक्कुटपालनांतर्गत या आजाराचा संसर्ग होण्याची भीती पसरविण्यात आल्याने त्यावेळीदेखील या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या परिस्थितीत तालुक्यातील तत्कालीन कुक्कुटपालन व्यावसायिकांनी केंद्र व राज्य शासनाला निवेदत देऊन मदतीची मागणी केली होती. मात्र सदर मागणीकडे दुर्लक्ष करीत अद्यापही मदत देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तथापि, या संकटातून कसेबसे सावरत यंदा नव्याने कुक्कुटपालन व्यवसाय सुरू असताना पुन्हा बर्ड फ्लू आजाराची अफवा पसरविण्यात आल्याने सदर व्यवसाय पूर्णत: बंद पडून लाखोचे नुकसान होण्याची भीती सबंधित व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने सबंधित व्यावसायिकांना येत्या १५ जानेवारीपर्यंत ५० लाखाची मदत न दिल्यास १८ जानेवारी रोजी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
दरम्यान, लाखांदूर येथील नायब तहसीलदार देवीदास पाथोडे यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कुक्कुटपालन शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष विनोद ढोरे, प्रदीप मुळे, योगेश सुरपाल, रोशन बागडे आदी उपस्थित होते.