करडी आरोग्यवर्धिनी केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर व अनुभवी कर्मचाऱ्यांची चमू उपलब्ध आहे. प्रशस्त दवाखाना इमारत व २५ च्या जवळपास बेड संख्या उपलब्ध आहे. गरज आहे ती शासन - प्रशासनाने संकट काळातील तातडीची मदत देण्यासाठी एक पर्यायी सेवा निर्माण करण्याची. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. खेड्यापाड्यांतही सामाजिक संसर्ग वाढल्याने अत्यंत धोकादायक परिस्थिती दिसून येत आहे. सामाजिक सलोख्याची भावना लोप पावत चालली आहे. बऱ्याचदा रुग्णाला वेळेत उपचारासाठी शासकीय वाहन उपलब्ध होत नाही. तसेच धास्तीमुळे खासगी वाहनचालक शहरांपर्यंत वाहन देण्यास मनाई करीत असल्याने कोरोनाचे वादळ अधिक घोंघावताना दिसून येत आहे.
शहरांप्रमाणे खेड्यांतही मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उपचारांच्या सुविधांअभावी अनेकांनी वाटेत दम सोडला. तर काहींनी शासकीय दवाखान्यात बेड व ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर्सची सुविधा न मिळाल्याने अखेरचा श्वास घेतला. कोरोनाच्या दुसऱ्या टप्यात अत्यंत गैरसोयींचा सामना सर्वसामान्यांना सहन करावा लागतो आहे. तिसऱ्या टप्प्याचे संक्रमण रोखण्यासाठी तसेच उपाययोजनांची व्याप्ती वाढविण्याची आजच नियोजन करणे काळाची गरज झाली आहे.
तेव्हा शासन व प्रशासनाने करडी आरोग्य केंद्र व उपकेंद्रात सदर सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करडीचे सरपंच महेंद्र शेंडे, पालोराचे सरपंच महादेव बुरडे, माजी सरपंच भुपेंद्र पवनकर, खडकीचे सरपंच अश्विन बागडे, ढिवरवाडाचे सरपंच धामदेव वनवे, कान्हळगावचे सरपंच दिगांबर कुकडे, मुंढरीचे सरपंच एकनाथ चौरागडे, पांजरा (बोरी) चे सरपंच किरण शहारे, निलजचे सरपंच मोहतुरे, सरपंच सुवर्णा गाढवे, नवेगावचे सरपंच मोहतुरे, देव्हाडाचे उपसरपंच भाऊराव लाळे, मोहगावचे सरपंच संतोष शेंडे, यांनी केली आहे.
तर ... उपचाराअभावी होणारे मृत्यू टाळता येतील
करडी परिसरातील ३५ हजार लोकसंख्येसाठी एकमेव आरोग्य केंद्र करडी येथे आहे. केंद्रांतर्गत पालोरा, जांभोरा, करडी, मुंढरी, निलज बुज व देव्हाडा खुर्द येथे उपकेंद्र आहेत. प्रत्येक उपकेंद्रात बीएएमएस डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची चमू आणि चार ते पाचच्या संख्येत बेड उपलब्ध आहेत, तर करडी येथे २० ते २५ बेड उपलब्ध आहेत. शासन प्रशासनाने शासकीय रुग्णालयांत तसेच खासगी रुग्णालयात सुविधांअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आरोग्य केंद्र व उपकेंद्रात व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिल्यास ग्रामिणांना मोठा दिलासा दिल्यासारखे होईल. तसेच उपचाराअभावी होणारे मृत्यूचे प्रमाणही कमी करता येईल, अशी कळकळीची भावना सरपंच महेंद्र शेंडे यांनी व्यक्त केली आहे.