भंडारा : यावर्षी किरकोळ बाजारात १२० रुपये किलोवर पोहोचलेल्या तूर डाळीचे भाव सध्या ११० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मागणी कमी झाल्याने भावात घसरत असल्याचे व्यावसायिकांचे मत आहे. दुसरीकडे वायदा बाजारात साठेबाज सक्रिय झाल्याने मसाले पदार्थांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आंबे स्वस्त तर डाळी स्वस्त, असे व्यापाऱ्यांचे समीकरण आहे. मध्यंतरी प्रति किलो ६० ते ७० रुपये पोहोचलेल्या आंब्याचे दर २५ ते ३० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्याचा परिणाम डाळींच्या किमतीवर पडला आहे. याशिवाय भाज्यांच्या किमती आटोक्यात असल्याने डाळींना मागणी कमी आहे. लग्नसराई हेसुद्धा डाळींचे भाव कमी होण्याचे कारण सांगितले जात आहे. भाव आणखी कमी होण्याच्या शक्यतेने किरकोळ व्यावसायिकांनी खरेदी थांबविलेली आहे. (प्रतिनिधी)तूर डाळीत ६०० रुपयांची घसरण!बाजारात दर्जानुसार ९,६०० ते ११,२०० रुपये क्विंटलवर गेलेले तूर डाळीचे भाव १० दिवसांतच ६०० रुपयांनी कमी होऊन ९,००० ते १०,६०० रुपयांपर्यंत उतरले आहेत. गावरानी तुरीचे भाव ५०० रुपयांनी कमी होऊन ७,४०० रुपये तर आयातीत तूर ७,२०० रुपयांपर्यंत खाली आली आहे. याशिवाय चना ३५० रुपयांनी कमी होऊन भाव ४,५५० ते ४,६०० रुपयांवर पोहोचले तर चना डाळीतही ५०० रुपयांची घसरण झाली असून भाव ५,७०० ते ६,३०० रुपयांवर आहेत. मूग मोगर ५०० रुपयांच्या घसरणीसह १०,३०० ते ११,३०० आणि उडद मोगर १०,५०० ते ११,५०० रुपये क्विंटल भाव आहेत. मसूर डाळ ७,६०० ते ८,००० रुपये, वाटाणा डाळ ३,३०० ते ३,४०० आणि लाखोळी डाळ ३,२०० ते ३,३०० रुपयांवर स्थिरावले आहेत.दर्जेदार गव्हाला मागणीमागील वर्षीच्या तुलनेत गव्हाचे दर वधारले आहेत. बाजारात एमपी बोट ३,२०० ते ४,०००, मध्यम २,४०० ते २,८००, लोकवन २,००० ते २,४००, राजस्थान (कोटा) तुकडी २,२०० ते २,४५० रुपये क्विंटल भाव आहेत. दुसरीकडे तांदळाचे भाव स्थिर आहेत. यंदा भाववाढीची स्थिती मान्सूनवर अवलंबून आहे. मे महिन्यात चिन्नोर आणि जयश्रीराम तांदळाला मागणी आल्याने भाव प्रति क्विंटल ५०० रुपयांनी वाढले, आता मागणी कमी झाली आहे. ठोक बाजारात चिन्नोर प्रति क्विंटल ४,५०० ते ४,९००, जयश्रीराम ३,६०० ते ४,५००, एचएमटी ३,१०० ते ३,५००, बीपीटी २,५०० ते २,८००, हलका सुवर्णा २,१०० ते २,४००, कनकी १,६५० ते ३,२०० रुपये भावात विक्री सुरू आहे. आंध्रमध्ये तांदळाचे विक्रमी उत्पादन झाले असून दर्जाही चांगला आहे. मसाल्यांचे पदार्थ महागयावर्षी मसाल्यांच्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यानंतरही भाव कमी होण्याऐवजी आकाशाला भिडले आहेत. वायदे बाजार, मालाची साठेबाजी आणि मध्यप्रदेश व राजस्थानातील व्यापाऱ्यांच्या उलाढालीमुळे भाववाढ झाली आहे. उन्हाळ्यात सर्वाधिक विकला जाणाऱ्या मेथी दाण्याचे भाव इतवारी बाजारात प्रति किलो ३५ रुपयांची वाढून भाव ८५ ते ९३ रुपयांवर गेले आहेत. यावर्षी मेथीचे पीक तिपटीने आले आहेत. जिरे आणि जाडी सोपचे भावही प्रचंड वाढले आहेत. जिऱ्याचे भाव प्रति किलो १९७ ते २४० रुपये आणि दर्जानुसार सोप ११५ ते २२० रुपयांवर आहे. धणे बाजारावर सट्टा बाजाराचा ताबा आहे. यावर्षी तीन ते चारपट उत्पादन वाढल्यानंतरही भाव प्रचंड वाढले आहेत. दर्जानुसार प्रति किलो भाव ७० ते ११५ रुपये आणि १९० ते २०० रुपयांवर तसेच मोहरी डाळ ५८ वरून ७२ रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय काजू आणि बादाम या सुका मेव्याच्या भावातही प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यात बादाम प्रति किलो ३०० रुपयांनी वाढून ८५० रुपये तर काजू दर्जानुसार ५७० ते ८५० रुपये भाव आहेत.
डाळीत घसरण, मसाले महाग
By admin | Published: May 24, 2015 1:19 AM