भंडारा : एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना नागरिक बेफिकिर असल्याचे दिसून येते. हाच दृष्टीकोन समोर ठेवून स्थानिक प्रशासनाच्या पथकाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली. यात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता वावरणाऱ्या ६२० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या शिवाय मंगल कार्यालय लॉन हॉटेल बाळ व वाईन शॉप व अन्य आस्थापनांमध्येही तपासणी करण्यात आली.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला टेंशन देणारी ठरली आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन वारंवार जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करण्यात येत आहे. मात्र सांगूनही नियमांना तिलांजली देण्याचा प्रकारही सर्रास सुरू आहे. मास्क न घालता व सोशल डिस्टंसिंग चे पालन न करता नियमांना बगल देत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याचे उद्दिष्ट समोर ठेवून भंडारा शहरात स्थानिक प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत जिल्हा प्रशासनासह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. भंडारा शहरातील मंगल कार्यालये, लॉन, बार, रेस्टॉरंट तसेच इतर आस्थापनांची तपासणी करून त्यांच्यावर दंडात्मक करण्यात कारवाई करण्यात आली.
यात १८ दुकानांसह मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. याशिवाय चार बार व रेस्टॉरंटची ही तपासणी करून या सर्वांकडून ते ३३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या ६२० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ९५ हजार ५५० रुपयांची दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईत उपजिल्हाधिकारी मीनल करणवाल यांच्यासह भंडारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, नगरपालिकेचे कर्मचारी प्रशांत गणवीर, मिथुन मेश्राम, संग्राम कटकवार, दादी मिश्रा, राहुल देशमुख यासह अन्य कर्मचारी सहभागी आहेत.