करडी(पालोरा) : परिसरातील गावागावात झालेल्या अँटिजेन तपासणीत समोर आलेले पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे चिंताजनक आहेत. तरीही विनाकारण रस्त्यांवरून फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने १३ एप्रिल रोजी करडी पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाचे वतीने वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. १० वाहन चालकाकडून प्रत्येकी १०० रुपये वसूल करण्यात येऊन रक्कम ग्रामपंचायतच्या सामान्य फंडात जमा करण्यात आली.
करडी, पालोरा, मुंढरी व देव्हाडा परिसरातील सर्व गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस वाढीस लागला आहे. कोरोनाच्या सामाजिक संक्रमणाची लाट आल्यासारखी भयावह परिस्थिती आहे. व्यापारी, दुकानदार, किरकोळ विक्रेते, भाजीपाला दुकानदार, नोकरदार, आशा वर्कर आणि मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक, लहान मुलेसुद्धा संक्रमित झालेली आहेत. घराघरात सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण उघडकीस येत आहे. तपासणीला घाबरून घरात दडून असलेल्यांची संख्या त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एकीकडे संसर्ग वाढला असतांना दुसरीकडे संक्रमितांचे मरणाचे प्रमाणही वाढीस लागले आहे. प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून शासन प्रशासनाचे वतीने संचारबंदी लावण्यात आली. वीकेंड लाकडाऊनही सुरू करण्यात आले. व्यापारी व दुकानदारांसाठी वेळापत्रक लावण्यात आले. परंतु अजूनही अपेक्षित परिणाम येतांना दिसून येत नसल्याने आता करडी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने संयुक्त बैठक घेत पुढचे पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत महसूल ग्रामपंचायतीला जमा करण्याचे धोरण राबविले जात आहे.
त्याचाच भाग म्हणून१३ एप्रिल रोजी करडी गरदेव चौकात १० वाहन चालकांवर कारवाई करीत १००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वेळेत दुकाने बंद न करणाऱ्याकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल केला जाईल, असे करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नीलेश वाजे यांनी सांगितले आहे.
थाटात लग्न पडले महागात
कोरोना वाढत असतांना परिसरात धूमधडाक्यात लग्न पार पाडले जात आहेत. करडीत असेच एक लग्न पार पडले. मात्र लग्नानंतर झालेल्या तपासणीत लग्नाघरचे सात जण एकाच वेळी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. लग्नाला येणारे नातेवाईकही पॉझिटिव्ह असण्याचे संकेत व्यक्त होत आहे. लग्न महागात पडल्याची चर्चा आता करडीत होत आहे.
करडी कंटोनमेंट झोन घोषित
करडीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाचे करडी शारदा मंदिर परिसर, बसस्थानक परिसर, देतखोवा भागाला कंटोनमेंट क्षेत्र घोषित करण्यात आला.
नागरिकांना विनाकारण घराबाहेर जाण्यास मनाई आदेश लावण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते निशिकांत इलमे यांनी दिली आहे.
होम क्वारंटाईन इसमांचा संचार धोकादायक
सामाजिक संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतीचे वतीने वारंवार काळजी घेण्यासोबत तपासणी व औषधोपचार करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु अजूनही अनेकांना स्वतःची व घरातील सदस्यांची आणि शेजाऱ्यांची काळजी वाटतांना दिसत नाही. आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केलेले इसमही बिनधास्तपणे घराबाहेर वावरतांना दिसत असल्याने धोका वाढला आहे.