चिखलीसह परिसरात आजही मिरची पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले जात. मात्र यासाठी शेतकऱ्यांना दूर अंतरावरून मिरचीची रोपे आणावी लागत होती. यासाठी अधिकचा खर्च मोजावा लागत होता. शिवाय रोपे दर्जेदार नसल्याने पाहिजे असलेले वाहन मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अल्प उत्पादन व्हायचे. मात्र कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांनी परिसरातील शेतकर्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आपल्या रोपवाटिकेतून कमीत कमी खर्चात शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार त्यांना पाहिजे असलेल्या वाणाची रोपे देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे खरीप हंगामापूर्वी त्यांच्याकडे आतापर्यंत दोन लाख मिरची, वांगे रोपांची ऑर्डर बुक झाली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना पाहिजे असलेल्या वाणाच्या प्रजातींसह दर्जेदार रोपांची रोपवाटिकेत लागण केली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या शेतात भाजीपाला लागवड आधुनिक पद्धतीने केली असून, एक एकरातील भाजीपाल्यातून त्यांनी चांगले उत्पन्न मिळवले आहे. यासोबतच त्यांनी गावातील आठ महिलांसह दोन पुरुषांना कायमस्वरूपी रोजगार दिल्याने त्यांची भटकंती थांबली आहे. त्यामुळे खऱ्याअर्थाने कृषी विभागाची अहिल्यादेवी रोपवाटिका ही शेतकरी तानाजी गायधने यांच्यासह गावातील मजुरांना अर्थार्जनाचे साधन ठरली आहे. रोपवाटिकेसाठी भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, शांतिलाल गायधने, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, कृषी सहायक रेणुका दराडे, खेमा टिचकुले, कृषीमित्र श्याम आकरे यांचे सहकार्य मिळाले आहे.
कोट
मी अर्ध्या एकरात कृषी विभागातर्फे अहिल्यादेवी रोपवाटिका उभारली आहे. या रोपवाटिकेतून शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मिरची व भाजीपाला, फळपिकांची रोपे देण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे गावातील मजुरांना रोजगार मिळालाच; शिवाय शेतकऱ्यांकडून आतापर्यंत दोन लाख रोपांचे बुकिंगही झाले आहे.
तानाजी गायधने, कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी, चिखली
कोट
शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकांसह फळबाग लागवडीकडे कल वाढला आहे. त्यामुळे दूरवरून रोपे विकत आणण्यापेक्षा परिसरातील शेतकऱ्यांची गरज ओळखून भंडारा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांना अहिल्यादेवी फळ रोपवाटिकेचा लाभ दिला आहे. त्यांना दर्जेदार रोपे निर्मितीसाठी सातत्याने भेटी देत मार्गदर्शन कृषी विभागातर्फे केले जात आहे.
अविनाश कोटांगले, तालुका कृषी अधिकारी, भंडारा