युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात आता धानाची कापणी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक तर मळणीचे प्रमाणही ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. जिल्हा पणन महासंघाकडून जिल्ह्यात १२८ केंद्रांना धान खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यापैकी केवळ ७६ केंद्रांवर प्रत्यक्ष धान खरेदीला सुरुवात झाली असून, शुक्रवारपर्यंत १ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. अद्यापही पर्याप्त धान खरेदी केंद्र सुरू झालेली नसल्याने व्यापाऱ्यांचे फावत आहे.
यंदा धान खरेदी केंद्रांअभावी व्यापाऱ्यांना मोकळे रान आहे. पैशांची गरज असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांच्या दारात उभे राहात आहेत. शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा फायदा धान खरेदी करणाऱ्या खासगी व्यापाऱ्यांकडून घेतला जात आहे. मात्र, आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी हतबल आहे. यंदा शासनाने थानाला २ हजार ३२० रुपये हमीभाव जाहीर केला. या हमीभावापेक्षा कमी दराने धानाची खरेदी करणाऱ्या खासगी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार शासनाने बाजार समितीला दिले आहेत. परंतु, कुठेही कारवाई होताना दिसत नाही.
वैधमापन यंत्रणा लक्ष देणार का?मोजमापात मोठ्या प्रमाणात 'पाप' होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच वाहन खर्च, मालाच्या प्रतीनुसार वेगवेगळे भाव व मोजमापासाठी लागणारा विलंब व कमी दरात धान खरेदी होत असल्याने शेतकरी कंगाल होत आहे. यंत्रणेकडून वजनकाटे व मापांची तपासणे गरजेचे आहे.
खासगीच्या मापातही हातचलाखी व्यापारी आधीच धानाला भाव कमी देत असताना वजन काट्याच्या मोजमापातही हातचलाखी होत आहे. धान मोजणीसाठी काही ठिकाणी २५ किलो तर काही ठिकाणी ४० किलो मोजमाप केले जाते. वापरल्या जाणाऱ्या मापांबद्दल शेतकऱ्यांना शंका आहे.
केवळ नोंदणी, प्रत्यक्ष खरेदी केव्हा? जिल्ह्यात १२८ धान खरेदी केंद्रांना धान खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाइन नोंदणीची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, शासकीय धान खरेदी केंद्र मोजक्याच ठिकाणी सुरु झाली आहेत. त्यामुळे दौड महिन्यापासून शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ ऑनलाइन नोंदणीच करणार तर धान खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
आर्द्रतेच्या नावाखाली १५० रुपयांपर्यंत कपातजिल्ह्यात अद्यापही केंद्र सुरू होण्याची तारीख जाहीर नाही. परिणामी, खासगी व्यापाऱ्यांकडून धानाला २ हजारांचा दर दिला जात आहे. खासगी धान काट्यावर माल नेल्यावर आर्द्रतेच्या नावाखाली १०० ते १५० रुपयांची कपात होत असते.