पवनी तालुक्यात कोंढा परिसर धानाचे कोठार आहे. परिसरात मुख्य पीक धान असून शेतकरी साधारण, उच्च प्रतीचे धान घेत असतात. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी उच्च प्रतीच्या धानाची लागवड केली, पण त्या धानाला २२०० पेक्षा जास्त भाव मिळताना दिसत नाही. यावर्षी प्रत्येक शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे धानाचे उत्पादन अत्यल्प झाले. किडीच्या प्रादुर्भावामुळे तीन, चार वेळा कीडनाशक फवारणी करून काही उपयोग झाला नव्हता. एकरी १० पोती धानदेखील झाले नाही. त्यातच उच्च प्रतीच्या धानास योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
साधारण धान आधारभूत केंद्रावर शेतकरी विकतात. त्यास १८०० रुपये भाव व ७०० रुपये बोनस असे २५०० रुपये क्विंटल दर पडते. उच्च प्रतीचे धान २२०० रुपये विकले जात आहे. शेतकऱ्यांना यावर्षी प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. त्यास देखील विकण्यास अडचण जाते आहे. घरगुती ग्राहक यांनी खाण्यास चार हजार रुपयांप्रमाणे तांदूळ घेतले. पण उच्च प्रतीचे तांदळास मार्केटमध्ये मागणी तेवढी नसल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी, उपबाजार समितीत येथे धान पडून आहे. त्यास ग्राहक मिळताना दिसत नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी धानाचे तांदूळ राईस मिलमध्ये केले त्यांना ग्राहक मिळत नाही. मालाचा उठाव होत नाही. त्यामुळे शेतकरी निराश झाला आहे. कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न पडला आहे. पवनी तालुक्यातील ७९ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याने पीक विमा योजना याचा फायदा मिळणे आवश्यक आहे. त्याबाबतीत शासनाने अद्यापही घोषणा केली नाही. चौरास भागातील शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. धान पिकातून जे पैसे मिळतात त्याचा उपयोग शेतकरी बँक, सहकारी संस्थाचे कर्जफेड करीत असतात. यावर्षी कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. धानाला योग्य दर देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.