लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत एक लाख ८२ हजार १९२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून त्याची किंमत ३४ कोटी तीन लाख ३५ हजार २७२ रुपये आहे. येत्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांना धानाचे चुकारे वितरित केले जातील, अशी माहिती आहे. जिल्ह्यातील ७३ धान खरेदी केंद्रावर आधारभूत किंमतीने खरेदी होत आहे. आधारभूत केंद्रावर खरेदी केलेला सर्व धान सर्वसाधारण ग्रेडचा असून अ ग्रेडच्या धानाची खरेदी निरंक आहे. जिल्ह्यात २९ ऑक्टोबरपासून धान खरेदीला प्रारंभ झाला असून ७९ केंद्रांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ७८ केंद्रांचे उद्घाटन झाले असून ७३ केंद्रावर खरेदी सुरू आहे. आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या एक लाख ८२ हजार क्विंटल धानामध्ये सर्वाधिक खरेदी लाखनी तालुक्यात ३९ हजार ७७५ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. भंडारा तालुक्यात १७ हजार ५३७ क्विंटल, मोहाडी २५ हजार ५०६ क्विंटल, तुमसर २२ हजार ४६५ क्विंटल, साकोली २८ हजार १८३ क्विंटल, लाखांदूर ३३ हजार ९९ क्विंटल, पवनी तालुक्यात १५ हजार ६२५ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाच हजार ९१५ शेतकऱ्यांनी आपला धान आधारभूत केंद्रावर विकला आहे. या धानाची किंमत ३४ कोटी तीन लाख ३५ हजार २७२ रुपये असून अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याला धानाचे चुकारे मिळाले नाही. आधारभूत किंमत १८६८ रुपये असून शासनाने ७०० रुपयाचा बोनस घोषित केला आहे. येत्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांना धानाचे चुकारे दिले जातील, असे सांगण्यात आले. यावर्षी सुरूवातीपासूनच धान खरेदी शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना आधारभूत केंद्रावर वाईट अनुभव आले होते. अनेक शेतकऱ्यांना आठ आठ दिवस विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र यावर्षी तशी स्थिती येणार नसल्याचे दिसत आहे. आठवडाभरापुर्वी मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यात धान खरेदी केंद्र वाढवून देण्याची सूचना करण्यात आली होती. पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांची संख्या वाढणार आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना यावर्षी धान विक्री करताना कोणत्याही अडचणी जाणार नाही.
नवीन धान खरेदी केंद्र मंजुरी आचारसंहितेत अडकली धान खरेदी केंद्रांना मंजुरीचे अधिकार १० नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेतील समितीला देण्यात आले आहे. या समितीत उपाध्यक्ष, जिल्हाधिकारी सदस्य म्हणून जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सदस्य सचिव म्हणून जिल्हा पणन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाची निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्यामुळे या समितीची बैठक झाली नाही. परिणामी नवीन धान खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली नाही. परंतु आचारसंहिता संपताच नवीन धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली जाणार आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत ७३ खरेदी केंद्रावर धान खरेदी केला जात आहे. मंजूर ७९ केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आधारभूत केंद्रावर कोणतीही अडचन नसून पुरेशाप्रमाणात बारदानाही आहे. येत्या आठ दहा दिवसात हमीभावानुसार धानाचे चुकारे केले जातील.-गणेश खर्चे, जिल्हा पणन अधिकारी भंडारा.