लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जगभरात कोरोना व्हायरसने शेकडो जीवांचा निष्पाप बळी जात आहे. तर दुसरीकडे संशयीत रुग्णांवरही करडी नजर ठेवली जात आहे. यात भंडारा जिल्हाही मागे नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थापित नर्सिंग वसतिगृहाच्या क्वारंटाईन कक्षातील संशयीत कोरोना रुग्णांची देखरेख नवख्या डॉक्टरांच्या खांद्यावर आहे. या प्रकाराने जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन किती गंभीर आहे यावरून समजते.जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. मात्र संशयीत रुग्णांची निगरानी केली जात आहे. बाहेर राज्यातून किंवा राज्यांतर्गत प्रवास केलेल्या इसमांची चौकशी करून होम क्वारंटाईन किंवा नर्सिंग वसतिगृह क्वारंटाईनमध्ये त्यांच्यावर कडक निगरानी ठेवली जात आहे. प्रारंभीच्या काळात विदेशातून आलेल्या सर्वही संशयीत रुग्णांवर होम क्वारंटाईनमध्ये पाळत ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यापैकी कुणालाही कोरोनाची लागण नव्हती. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र अलगीकरण (आयसोलेशन) कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यात ६० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांवर देखरेखीसाठी आळीपाळीने दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत एका डॉक्टरांची तर रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत दुसऱ्या डॉक्टरांची नियुक्ती असते. याशिवाय जिल्हा शल्य चिकित्सक निवासी वैद्यकीय अधिकारी यासह अन्य वैद्यकीय अधिकारी येऊन विचारपूस करून निघून जातात. मात्र संशयीत रुग्णांवर देखरेखीसाठी २४ तास नवख्या डॉक्टरांना डोळ्यात अंजन घालून कर्तव्य पार पाडावे लागत आहे.जिल्हा रुग्णालयात प्रदीर्घ अनुभवी डॉक्टर्स उपलब्ध असताना नवख्या डॉक्टरांवर संशयीत कोरोना रुग्णांच्या देखरेखीची जबाबदारी देण्यात आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वेळप्रसंगी या नवख्या डॉक्टरांना वरिष्ठांचे मार्गदर्शन किंवा त्याचवेळी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यास मोठा धोका उद्भवू शकतो, यात दुमत नाही.अनुभवी डॉक्टरांच्या नियुक्तीची गरजक्वारंटाईन वॉर्ड व आयसोलेशन वॉर्डमध्ये आळीपाळीनेही राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत कर्तव्य बजाविणाऱ्या डॉक्टरांची तैनाती करण्यात आली आहे. त्यातही सहा डॉक्टरांना रोटेशन नुसार ३१ मार्चपर्यंत ड्युटी देण्यात आली आहे. यातही अनुभवी डॉक्टरांची तैनाती किंवा नियुक्ती करण्यात आलेली नाही. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असताना नवख्या डॉक्टरांवर एवढी मोठी जबाबदारी कशी काय देण्यात आली असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.होम क्वारंटाईन व आयसोलेशन वॉर्डामध्ये नियुक्त करण्यात आलेले डॉक्टर्स अनुभवी आहेत. बीएएमएस पदवीधारक असले तरी त्यांचा अनुभव दांडगा आहे. विशेषत: क्वारंटाईनमध्ये दाखल झालेले रुग्ण हे फक्त संशयीत असून नॉर्मल आहेत. परिणामी चिंतेचे कारण नाही.-डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा.
क्वारंटाईन कक्षातील रुग्णांची देखरेख नवख्या डॉक्टरांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 5:00 AM
जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. मात्र संशयीत रुग्णांची निगरानी केली जात आहे. बाहेर राज्यातून किंवा राज्यांतर्गत प्रवास केलेल्या इसमांची चौकशी करून होम क्वारंटाईन किंवा नर्सिंग वसतिगृह क्वारंटाईनमध्ये त्यांच्यावर कडक निगरानी ठेवली जात आहे. प्रारंभीच्या काळात विदेशातून आलेल्या सर्वही संशयीत रुग्णांवर होम क्वारंटाईनमध्ये पाळत ठेवण्यात आली होती.
ठळक मुद्देआळीपाळीने कर्तव्य : जिल्हा रुग्णालयाचा कारभार