प्रकल्पग्रस्तांशी चर्चा : नाना पटोले यांचे आश्वासनपवनी : गोसेखुर्द धरणामुळे बाधीत असलेल्या खापरी रेहपाडे गावाचे पुनर्वसन कुठे व कसे करावे, यासंदर्भात ग्रामस्थ, भूअर्जन अधिकारी व गोसेखुर्द पुनर्वसन विभाग यांच्यामध्ये समन्वय राहिलेला नाही. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. पुनर्वसनास विलंब लागत असल्याने स्वेच्छा पुनर्वसन करावी, अशी मागणी झाली. त्यानुसार विशेष ग्रामसभा आयोजित करून ठराव संमत करण्यात आला तरीसुद्धा कुटुंबाची माहिती उपलब्ध नाही, असे कारण पुढे करून संबंधित अधिकारी पुनर्वसनाचे प्रकरण प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.परसोडी खापरी येथील रूपचंद माटे या इसमाचा वाघाने बळी घेतल्यानंतर त्यांचे कुटुंबीयांचे सांत्वन करून शासकीय मदत देऊन परत येत असताना खापरी रेहपाडे येथील ग्रामस्थांनी खासदार नाना पटोले यांना थांबवून पुनर्वसनाची व्यथा सांगितली. गोसेखुर्द धरणात साठविलेले पाणी व उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य या दोहोमुळे नागरिक त्रस्त असल्याने शक्य तितक्या लवकर गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असता खासदार नाना पटोले यांनी गोसीखुर्दचे पुनर्वसन विभाग तसेच उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य या दोन्ही विभाग प्रमुखांसोबत चर्चा करून खापरी रेहपाडे गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार, असे आश्वासन नागरिकांसोबत झालेल्या चर्चेत दिले. पुनर्वसनाचा जास्तीत जास्त लाभ बाधीत कुटुंबांना मिळावा, अशी शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.यावेळी जि.प.माजी सभापती हंसा खोब्रागडे, उमरेड-कऱ्हांडला वनजीव विभागाचे डीएओ भलावी, गोसीखुर्द धरण विभागाचे कार्यकारी अभियंता काळे, पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष बिसन शेंडे, सचिव जितेंद्र रेहपाडे, मनोहर सुर्यवंशी, डॉ. सुनिल जीवनतारे, उपसरपंच सुखराम वटी, नरेश रेहपाडे, प्रकाश रेहपाडे, अशोक भोयर, पांडू भोयर, अॅड. जनार्धन जीवनतारे व ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
खापरी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2016 12:23 AM