भंडारा : सीईटी परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली गंडा घालणारे रॅकेट भंडारा जिल्ह्यात सक्रिय झाले आहे. करिअर अकॅडमीच्या माध्यमातून पालकांना हेरून त्यांच्याकडून पैसे आणि ओरिजनल कागदपत्र घेण्याचे प्रकार पुढे आले आहे. मुलांच्या भविष्याची चिंता असलेले पालक त्यांच्या जाळ्यात अलगद अडकत आहेत.
बारावीची परीक्षा झाल्यानंतर मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या चिंतेत अनेक पालक आहे. त्यातही कमी गुण मिळालेले विद्यार्थ्यांचे पालन आपल्या मुलाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश कसा मिळेल यासाठी प्रयत्न करीत आहे. पालकांची ही धडपड हेरून आता काही भामट्यांनी अशा पालकांना अक्षरश: लुटण्याचा प्रकार सुरू केला आहे. करिअर अकॅडमीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे कॉन्सिलिंग केले जाते. यावेळी पैसेवाला पालक हेरून त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार सुरू आहे.
भंडारा शहरातही असाच प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. येथील म्हाडा कॉलोनीत राहणाऱ्या एका शिक्षिकेच्या मुलाला सीईटीत कमी गुण मिळाले. मात्र त्यांना मुलाला अभियांत्रिकी शिक्षण द्यायचे आहे. यासाठी ते मुलाच्या मित्राच्या माध्यमातून एका करिअर अकॅडमीच्या संपर्कात आले. तेथे असलेल्या कॉन्सिलरने त्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणे शक्य नाही. व्यवस्थापन कोट्यातून आम्ही प्रवेश करुण देऊ. आमचे नागपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत संबंध आहे, असे सांगितले.
प्रवेशासाठी तीन लाख ९० हजार रुपये फी आणि कॉन्सिलरचे पाच हजार रुपये कमिशन सांगण्यात आले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आपल्या मुलाचे ओरिजनल कागदपत्रे आणि ५० हजार रुपयांचा चेक संबंधिताला दिला. परंतु काही दिवसांत आपली फसवणूक तर होणार नाही ना म्हणून त्यांनी नागपूर येथे जाऊन महाविद्यालयात चौकशी केली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच कॉन्सिलरला गाठले. सुरुवातीला त्याने गोड बोलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु पालकाच्या तगाद्याने त्याने एका कागदावर स्वाक्षरी घेऊन ओरिजनल कागदपत्रे परत केले. परंतु ५० हजार रुपये देण्यास टाळाटाळ सुरू केली. वारंवार भेटूनही पैसे देत नाही. याप्रकाराने हतबल झालेला पालक आता पोलीस ठाण्यात जाण्याच्या तयारीत आहे. असे अनेक प्रकार भंडारा शहरात सुरू असून, याकडे कुणाचेही लक्ष नाही.
मुलांच्या भविष्याच्या चिंतेत पालक
आपला मुलगा उच्च शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावा, असे प्रत्येक आई-विडलांचे स्वप्न असते. त्यासाठी वाट्टेल तो खर्च करायलाही तयार असतात. भंडारा शहरासोबतच नागपूर येथील इन्स्टिट्यूटमध्ये तीन ते चार लाख रुपये शुल्क भरून शिकवणी लावली जाते. त्यानंतरही कमी गुण आले की मग व्यवस्थापन कोट्यातून प्रवेशासाठी धडपड सुरू होते. अशावेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर प्रवेश मिळूही शकतो. परंतु आता अशा पालकांना हेरणारे अनेक भामटे सक्रिय दिसत आहे.
टोकनची रक्कम परत मिळत असते काय
५० हजार रुपयांचा धनादेश दिल्यानंतर वारंवार पैसे मागणी करणाऱ्या पालकाला कॉन्सिलर टोलवाटोलवी करीत आहे. प्लॉट किंवा घरखरेदी करताना आपण टोकन म्हणून पैसे देतो. व्यवहार पूर्ण झाला नाही तर टोकनची रक्कम कधी तरी परत मिळते काय, असे कॉन्सिलर या पालकांना सांगून ही रक्कमही परत मिळणार नाही, असे अप्रत्यक्ष सांगत आहे. अनेक पालकांना असा अनुभव आहे.