लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना भंडारा शहरात गत काही दिवसांपासून रांगा लावून दिवाभर ताटकळावे लागते. गुरुवारी शहरातील साई मंगल कार्यालय, नगर परिषद, कामगार अधिकारी कार्यालय आणि पोस्टात शेकडो नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. महिलांसह अनेकजन आपल्या नंबरची प्रतीक्षा करीत होते. गावखेड्यातून आलेल्या या नागरिकांना ‘लाभा’साठी चांगलाच मनस्ताप करावा लागत आहे.अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या कीट वितरणाचा गोंधळ संपायचे नाव घेत नाही. गत १५ दिवसांपासून गावागावांतील लाभार्थी कामधंदे सोडून सकाळपासूनच भंडारा शहरात दाखल होत आहे. सुरक्षा कीट मिळविण्यासाठी त्यांची सकाळपासून रात्री उशिरापर्यंत धडपड सुरु असते. यात महिलांचीही संख्या मोठी आहे. येथील साई मंगल कार्यालयात गुरुवारी तर प्रचंड गर्दी झाली होती. बांधकामामुळे एकेरी झालेल्या रस्त्यावर ही रांग लागली होती. मंगल कार्यालयाच्या तिन्ही बाजूला रांगा दिसत होत्या. त्यातच धूळ उडू नये म्हणून रस्त्यावर पाणी मारण्यात आले. त्यामुळे तेथे चिखल झाला. अशा परिस्थितीतही उभे राहून थकलेल्या महिला रस्त्यावर बसून होत्या. या गर्दीसोबतच याच परिसरात कामगार कार्यालयापुढेही हातात कागदपत्र घेतलेले लाभार्थी रांग लावून उभे होते.नगर परिषदेत बांधकाम कामगारांची नोंदणी होत असल्याने तेथेही गुरुवारी प्रचंड गर्दी दिसून आली. नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच लाभार्थ्यांनी रांग लावल्याने न.प. मध्ये जाणे कठीण झाले होते. विशेष म्हणजे भंडारा शहरातीलच नव्हे ५० किलोमिटरवरुन आलेले बांधकाम कामगार नोंदणीसाठी उन्हात उभे होते. विशेष म्हणजे कामगार उपायुक्तांनी जिल्ह्यात चार ठिकाणी सुरक्षा कीट वितरण केंद्र सुरु केले पंरतू माहिती अभावी शेकडो कामगार भंडारा शहरातच दाखल होत आहे. गावावरुन येण्याजाण्याचा खर्च, मजूरी बुडते ती वेगळी अशा स्थितीत किट मिळविण्यासाठी केविलवाणी धडपड करतांना लाभार्थी दिसत आहे.आंबाडीच्या तरुणाने दाखविली जागरुकताभंडारा तालुक्यातील आंबाडी येथील निरज देशमुख हा तरुण पेढे घेण्यासाठी गांधी चौकात आला होता. त्यावेळी त्याला कुणीतरी या योजनेचा फार्म भरुन मागितला. ही नागरिकांची शुध्द फसवणूक असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने याबाबत तात्काळ पोस्टाला माहिती दिली. मात्र पोस्टाने नेहमीप्रमाणे हात वर केले. शेवटी या तरुणाने प्रशासन आणि पोलिसांनाही हा प्रकार सांगितला. यावरुन प्रशासनाने दखल घेत नागरिकांना अशा अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. अखेर येथील गर्दी दुपारी ओसरली.
भंडारात लाभासाठी लाभार्थ्यांच्या रागांच रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 12:30 AM
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना भंडारा शहरात गत काही दिवसांपासून रांगा लावून दिवाभर ताटकळावे लागते. गुरुवारी शहरातील साई मंगल कार्यालय, नगर परिषद, कामगार अधिकारी कार्यालय आणि पोस्टात शेकडो नागरिकांनी रांगा लावल्या होत्या.
ठळक मुद्देनागरिकांना मनस्ताप : साई मंगल कार्यालय, नगर परिषद, पोस्टात गर्दी, सकाळपासून रात्री उशिरापर्यंत असतो ग्रामीण भागातील नागरिकांचा ठिय्या