गोंदिया : तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांवर कंबर कसण्यासाठी दवनीवाडा पोलिसांनी २६ मार्च रोजी हाेळीच्या पूर्वीच कारवाई केली. या कारवाईत १ लाख २४ हजार ४४० रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोदा येथे १ ठिकाणातून २ हजार, पिपरिया येथून २ ठिकाणातून २ हजार ८०० रुपयांचा माल, मुरदाडा येथे १ ठिकाणी धाड घालून ३ हजार रुपयाचा माल, रतनारा येथून १ ठिकाणातून १ हजार १४० रुपयांचा माल असा ८ हजार ९४० रुपयांचा माल जप्त केला.
दवनीवाडा हद्दीतील रतनारा, मुरदाडा, पिपरिया येथे अवैध दारू अड्ड्यावर धाडी टाकल्या आहेत. आरोपी दुलीचंद दामा शेंडे (३४) रा. पिपरिया, तिरोडा, याच्याकडून अवैधरित्या एक प्लास्टिक डबकीत १८ लीटर मोहाफुलाची हातभट्टी दारू किंमत १,८०० रुपयांचा माल मिळून आला आहे. इंदिराबाई हेमराज गठनकर (५४) रा. बोदा, यांच्याकडून अवैधरित्या एक मोठया प्लास्टिक डबकीत २० लीटर मोहाफुलाची हातभट्टीची दारू किंमत २ हजार रुपयांचा माल मिळाला आहे. देवेंद्र हिरदीराम नागपुरे (३८) रा. पिपरिया यांच्याकडून १० लीटर मोहाफुलाची दारू किंमत १ हजार रुपयांचा माल मिळून आला आहे. हेमराज बकाराम सुलाखे (४५) रा. मुरदाडा यांच्याकडून ३० लीटर मोहफुलाची दारू किंमत ३ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. रामचंद चिंतामण सोनवाने (५५) रा. रतनारा यांच्याकडून विनापरवाना अवैधरित्या देशी दारूचे १९ पव्वे किंमत १ हजार १४० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. बोंडराणी शिवारात वैनगंगा नदीपात्रात २० बोरी ६० किलोप्रमाणे व ९ मातीचे मटके ५० किलोप्रमाणे एकूण १ हजार ६५० किलो मोहफूल किंमत १ लाख १५ हजार ५०० रुपयांचा माल नष्ट केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यानच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नीलेश उरकुडे, पोलीस हवालदार नीलकंठ बोधनकर, देवराम खंडाते, पोलीस नायक कल्पेश चव्हाण, पोलीस शिपाई मोहन टेंभेकर, बुधराम डोहरे, हेमंत हर्षे, मेंढे यांनी केली आहे.
दुकानदारावर गुन्हा
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने त्यावर नियत्रंण राहावे याकरिता उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी यांनी १९ मार्च रोजी आदेश काढून दुकाने रात्री ८ वाजता बंद करण्यास सांगितले. आदेशाचे पालन न करणाऱ्या एका दुकानदारावर कारवाई करण्यात आली.