वामनराव चटप : ६ रोजी सेवाग्राम येथून एल्गारपवनी : अखंड महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा. वेगळा विदर्भ देता कि जाता असा सज्जड दम स्वतंत्र विदर्भाची मागणी करण्याकरीता व शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ६ एप्रिलला दुपारी १२ वाजता वर्धा-सेवाग्राम रेल्वे स्थानक येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे रेल रोको आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात विदर्भवादी जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख माजी आमदार अॅड.वामनराव चटप यांनी पवनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केले.१ एप्रिल रोजी मच्छीमार सोसायटीच्या प्रांगणात विदर्भ राज्याच्या मागणीसंदर्भात आंदोलनाविषयी माहिती देताना ते बोलत होते. पत्रपरिषदेत माजी आमदार अॅड.आनंदराव वंजारी, अॅड.गोविंद भेंडारकर, प्राचार्य जगनाके, नेवारे, प्रकाश पचारे, सुनंदा मुंडले, डॉ. विक्रम राखडे, सुरेश अवसरे, नगरसेविका शोभना गौरशेट्टीवार, राजेश येलशेट्टीवार, प्रवीण भोंडे उपस्थित होते.विदर्भाचे दोन अर्थसंकल्प श्रीनिवास खांदेवाले यांनी मांडले आहे. विदर्भाचे सगळ्या मार्गाचे २००५-०६ मध्ये उत्पन्न ४१,५६० कोटी रुपये होते खर्च ४१,४०० कोटी होता. नवीन कर न लावताही विदर्भाचा अर्थसंकल्प ११० कोटींनी शिलकीचा होता. विजेचे दर २० टक्के कमी केले व एकाही पैशाचा कर लावला नाही तरी विदर्भाचा अर्थसंकल्प १३,००० कोटींनी वाढला आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प ५४,४०० कोटीचा असून खर्च ५२,३८० कोटी आहे १,६६० कोटीचे शिलकीचे अंदाजपत्रक आहे. दोन्ही अर्थसंकल्पाला आजपर्यंत कोणीही आव्हान दिले नाही. आज महाराष्ट्रावर ४ लाख १३ हजार कोटीचे कर्ज असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत त्या थांबवणे व शेतमालाला हमी भाव देणे, बेरोजगारांचे प्रश्न सोडवणे, विजेचे लोडशेडिंग, निम्मे दरात वीज देणे, बचत गटावरील मायक्रोफायनान्सच्या कर्जमुक्तीसारख्या सर्वसमस्यांचे उत्तर वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती हेच असून विदर्भातील जनतेने या आंदोलनात सहभागी होऊन दिल्ली, मुंबई, कालकाताकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या थांबवून रेल रोको आंदोलन यशस्वी करावे. सेवाग्राम स्वातंत्र्यलढ्याचे महत्वाचे ठिकाण आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे याकरीता या आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन अॅड. चटप यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
विदर्भ राज्यासाठी रेल रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2017 12:33 AM