सौंदड : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील येथील चंद्रपूर- गोंदिया रेल्वे मार्गाची रेल्वे चौकी वाहनधारकांसाठी डोकदुखीची ठरत आहे. जडवाहन धारकांना ही क्रॉसींग पार करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला १५ हजार रूपये मोजावे लागत असल्याने येथे उड्डाणपुल तयार करण्याची मागणी केली जात आहे. या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांचे आवागमन होत असते. मात्र येथील चंद्रपूर-गोंदिया रेल्वे मार्गावरील रेल्वे क्रॉसींगमुळे जड व उंच सामान वाहून नेणाऱ्या वाहनांना क्रॉसींगला लागलेले हाईट पोल क्रॉस करावे लागते. यासाठी या वाहनांना रेल्वे प्रशासनाची परवानगी घेऊन त्यासाठी १५ हजार रूपये द्यावे लागतात. तर यासाठी लागणारी परवानगी आठवडा व १५ दिवसांपर्यंत मिळत नाही. परिणामी या वाहनधारकांना परवानगी मिळत पर्यंत महामार्गाच्या कडेलाच आपला संसार थाटावा लागतो. परवानगी मिळताच जेसीबीच्या मदतीने हाईट पोल हटविले जाते व त्यानंतरच वाहन रेल्वे क्रॉसींगने पुढे निघते. मात्र एवढ्यासाठी वाहन मालकाला १५ हजार रूपये रेल्वे प्रशासनाला मोजावे लागतात. करिता संबंधीतांनी याकडे लक्ष देत येथे उड्डाणपुल तयार करण्याची मागणी केली जात आहे. (वार्ताहर)
रेल्वे क्रॉसिंग ठरली डोकेदुखीची
By admin | Published: November 13, 2016 12:27 AM