नांदेकर यांनी यंदा रब्बी हंगामात स्वमालकीच्या अडीच एकर शेतात शतायू नामक धानपिकाची लागवड केली होती. धानपिकाच्या रोवणीला विलंब झाल्याने धान कापणीलादेखील विलंब झाला आहे. यादरम्यान गत दोन दिवसांपूर्वी घटनेतील शेतकऱ्याने मजुरांकरवी धानपिकाची कापणी केली. मात्र गत काही दिवसांपासून तालुक्यात नियमितपणे येणाऱ्या पावसाने कापणी झालेल्या धानपिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुक्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. गोदामांच्या अपर्याप्त सुविधेअभावी आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत उन्हाळी धानाच्या खरेदीला विलंब झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या लाखो क्विंटल धानाची खरेदी शिल्लक आहे. शेतकऱ्यांकरवी कापणी व मळणी केलेल्या उन्हाळी धानपोत्यांची घरात व उघड्यावर साठवण केल्याची माहिती आहे, मात्र गत काही दिवसांपासून तालुक्यातील विविध भागात नियमितपणे होणाऱ्या पावसाने शेतात कापणीपूर्ण धानपिकासह ऊघड्यावर साठवणूक करण्यात आलेल्या धानपिकाचे नुकसान होण्याची चिंता सर्वत्र व्यक्त केली जात आहे. या स्थितीत खरेदी केंद्रांतर्गत सावकाश गतीने करण्यात येत असलेल्या धान खरेदीला गती देण्यासाठी शासन- प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कापणी झालेल्या धानपिकाचे पावसाने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:24 AM