प्रतीक्षा पावसाची : शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकटलाखांदूर : ऐन वेळेवर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी वेळ वाया न घालता लगबगीने धानाचे पऱ्हे टाकले. कोंब बाहेर निघाल्यानंतर पावसाने दडी मारली, पाण्याअभावी आता पऱ्हे करपू लागले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले.यंदा जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शविल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने धानाचे पऱ्हे टाकणे सुरु केले. महागडी बियाणे केंद्रातून विकत घेतली. पावसाळ्यात धान बियाण्यांची उगवण क्षमता जास्त असल्याने रोपे लवकर वाढू लागली. परंतु पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली. अन् उगवलेली धानाची रोपे करपू लागली. अनेक शेतकऱ्यांनी टमकर व मिळेल त्या साधनाने पऱ्हे जगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. परंतु प्रयत्न अपुरे असल्याने आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू लागले.इटियाडोह धरणाचे पाणी तालुक्यातील हजारो हेक्टर सिंचन क्षमता असल्याने तात्काळ पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाकडे धाव घेवून पाणी सोडण्याची मागणी केली. निवडणुका असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देवून पाणी सुटणार का? म्हणून आता शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)
पावसाची उसंत, पऱ्हे करपले
By admin | Published: June 30, 2015 12:46 AM