भंडारा - साेमवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर काेसळलेल्या पावसाने दाणादाण उडाली असून नदीनाल्यांना आलेल्या पावसाने १६ मार्ग बंद पडले. तर भंडारा शहरातील रुख्मिनीनगर परिसरातील सुमारे ६८ घरात पहाटे ३ वाजताच्या सुमारास पाणी शिरले.
जिल्ह्यात साेमवारी रात्री १० वाजतापासून जिल्ह्यात जाेरदार पावसाला सुरुवात झाली. गत २४ तासात ६९.८ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. सर्वाधिक पाऊस भंडारा तालुक्यात १४० मिमी काेसळला. यापावसाने खात राेडवरील रुख्मिनी नगर परिसरातील सुमारे ६८ घरात पाणी शिरले. पहाटे ३ वाजता अचानक घरात पाणी शिरल्याने नागरिक भयभीत झाले. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुपारी ४ वाजेपर्यंत या घरामध्ये पाणी साचले हाेते. जिल्ह्यात झालेल्या पावसाने १६ मार्ग बंद पडले आहेत. त्यात माेहाडी तालुक्यातील १२, पवनी तालुक्यातील दाेन, भंडारा आणि तुमसर तालुक्यातील एकाचा मार्गाचा समावेश आहे. जिल्ह्यात रेड अर्लट जारी करण्यात आल्याने प्रशासनाने बुधवार १० ऑगस्ट राेजी सर्व शाळांना सुटी घाेषित केली आहे.