लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाच्या पाण्याचे जतन होत नसल्यामुळे भंडारा शहरात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. भविष्यात पाण्याचे जतन न झाल्यास सर्वांना गंभीर प्रकाराला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येथील सेवाश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रभात गुप्ता यांनी पाणी संवर्धनासाठी मोहीम हाती घेतली आहे. सामाजिक कार्य म्हणून त्यांनी गांधी चौकात जलकुंभ सुरू करून शितल जलसेवा सुरू केली आहे.सेवाश्रम चॅरिटेबल ट्रस्टने रेनवॉटर हॉर्वेस्टिंग सिस्टीम घरोघरी बसविणे का गरजेचे आहे, यासाठी जनजागृती करीत आहेत. पावसाचे नैसर्गिक पाणी वाचवा, रेनवॉटर हॉर्वेस्टिंग करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.बँकेत पैसे जमा केल्यावर ते पैसे वेळेवर कामी येतात. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्याची जमिनीत साठवणूक केल्यास भावी पिढीला पाणीटंचाईची झळ बसणार नाही. हा हेतू ठेऊन त्यांनी सेवाश्रम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पाणी प्रश्नावर पुढाकार घेतला आहे. रेनवॉटर हॉर्वेस्टिंग ही लोकचळवळ व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता पावसाळा लवकरच सुरू होणार आहे. पावसाचे पाणी म्हणजे पिण्याचे पाणी जमिनीत जिरवले तर पाणी पातळी वाढण्यासाठी मदत होणार आहे. प्रशासनाने पाणी टंचाईच्या काळात बोरवेल खोदण्यासाठी मनाई केली असतानाही शहरात बोरवेल खोदण्याचा सपाटा सुरू आहे. परंतु पावसाचे पाणी जिरविण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. बोरवेल खोदण्याचा हा सपाटा असाच सुरू राहिला तर भविष्यात पिण्याचे पाणी मिळणे कठीण जाईल.भंडारा शहर हे वैनगंगा नदीच्या काठावर वसलेला असून पिण्याचे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. रेनवॉटर हॉर्वेस्टिंगसोबतच दैनंदिन वापराचे पाणी नालीत वाहून जाते. ते जमिनीत मुरविल्यास पाणी पातळी वाढण्यासाठी मदत होऊ शकते,आजघडीला शहरातील खात रोड, म्हाडा कॉलनी, रामनगर वसाहतीत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे शहरातील सर्वच भागातील नागरिकांनी नैसर्गिक पाण्याचे जतन करण्यासाठी रेनवॉटर हॉर्वेस्टिंग सुरू करावे, त्यासाठी सेवाश्रम चॅरिटेबल ट्रस्ट मार्गदर्शन करेल, असेही गुप्ता यांनी सांगितले.
रेनवॉटर हॉर्वेस्टिंग करा आणि पावसाचे पाणी वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:49 PM
पावसाच्या पाण्याचे जतन होत नसल्यामुळे भंडारा शहरात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. भविष्यात पाण्याचे जतन न झाल्यास सर्वांना गंभीर प्रकाराला सामोरे जावे लागणार आहे.
ठळक मुद्देसेवाश्रम चॅरिटेबल ट्रस्ट करणार जनजागृती : पाण्याचे संवर्धन न झाल्यास भविष्यात भीषण जलसंकट