लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/तुमसर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे स्वपक्षावर नाराज असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले हे राजीनामा देऊन शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याची चर्चा रविवारला दुपारपासून जिल्ह्यात सुरू आहे. नाराज पटलेंना भाजपने आपल्याकडे खेचल्याची चर्चा त्यानंतर सुरू झाली. परंतु याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.याबाबत माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांना विचारले असता पटलेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा ऐकली असल्याचे सांगितले. अधिकृतरित्या येत्या दोन दिवसात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता सूत्राने दिली आहे.पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर पटले हे नाराज होते. त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ते संपर्कात होते. दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील पदाधिकाऱ्यांची नागपुरात बैठक घेतली होती. त्या बैठकीलाही जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले हे उपस्थित नव्हते.राजेंद्र पटले हे पोवार समाजाचे असून तुमसरचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे हे तुमसरचे असून पटले भाजपसोबत आल्यास त्यांचा भाजपला लाभ होऊ शकतो, असा सूर भाजपमध्ये आहे. त्या अनुषंगाने भाजपच्या एका नेत्याने पटले यांच्याशी संपर्क साधला. भाजपची खेळी यशस्वी ठरली आहे. पटले हे सोमवारला दिवसभर तुमसरात होते. परंतु त्यांनी कुणाचाही फोन रिसिव्ह केला नाही. भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही.राजेंद्र पटले हे सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंता पदाची २२ वर्षे नोकरी केल्यानंतर राजीनामा देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. जिल्हा परिषद निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतर तुमसर विधानसभेची भाजपने उमेदवारी नाकारली.किसान गर्जना संघटना स्थापन करून २०१४ ची विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढविली. त्यात पराभूत झाल्यानंतर त्यानंतर सेनेने त्यांना जिल्हाप्रमुख केले. शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते. पोवार समाजाची मते खेचून घेण्याकरिता भाजपने त्यांना आपल्याकडे नेल्याची चर्चा सुरू आहे. भाजपने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली असून भाजपच्या गळाला पुन्हा काही पक्षाचे नेते लागण्याची शक्यता आहे.
राजेंद्र पटलेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:29 PM
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे स्वपक्षावर नाराज असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले हे राजीनामा देऊन शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याची चर्चा रविवारला दुपारपासून जिल्ह्यात सुरू आहे.
ठळक मुद्देभाजप प्रवेशाची चर्चा : आणखी काही नेते भाजपच्या गळाला लागणार