करडी (पालोरा) :- २०१३ मध्ये अवघ्या अर्धा एकर शेतीवर राजू भोयर यांनी सुरू केलेला प्रवास आता सात एकरांपर्यंत पोहोचला आहे. परिसरातील ३० मजुरांना कायमचा रोजगार तर वार्षिक २० लाखांचे उत्पन्न मिळत आहे. लागवड मजुरी, खते, बियाणे यासाठी वार्षिक १० लाख रुपये खर्च येत असून १० लाखांचा फायदा मिळत आहे. शेती परवडणारी नाही, अशी नेहमी शेतकऱ्यांची ओरड असते. मात्र, शेतीमध्ये योग्य नियोजन केले तर शेतीमधूनसुद्धा आर्थिक उन्नती साधता येते, हेच या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.
पालोरा येथील बेरोजगार तरूण राजू भोयर शेतकऱ्याने नोकरीची अपेक्षा न करता अर्धा एकर शेतीमधून नर्सरीचा प्रवास सुरू केला होता. सात वर्षांनंतर आज राजू भोयर यांच्या ओम रोझ नर्सरीत ५० प्रजातींची झाडे आहेत. तर, गाव व परिसरातील ३० मजुरांना रोजगारसुद्धा देत आहेत. मागणीनुसार आंध्र प्रदेश ते पश्चिम बंगालपर्यत फुल व फळझाडांच्या रोपांची विक्री होत आहे. थेट नर्सरीतून भंडारा, गोंदिया, बालाघाट येथील व्यावसायिक गाड्या भरून फुलांची झाडे नेत आहेत.
कोट
अर्धा एकरावर सुरू केलेला नर्सरीचा व्यवसाय वाढत्या मागणीमुळे दरवर्षी वाढतो आहे. मागणीनुसार पुरवठ्यासाठी दरवर्षी विस्तार होत आहे. आज फुलांसह फळझाडांची रोपे उपलब्ध आहेत. चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया येथील व्यापारी स्वत: नर्सरीमध्ये येऊन रोपे घेऊन जातात.'
- राजू भोयर, मालक ओम रोड़ा नर्सरी पालोरा
मजूर म्हणतात, नर्सरीमुळे चिंता मिटली...
नर्सरीत काम करणारी मजूर उषा बोंद्रे म्हणतात, राजू भोयर यांच्या नर्सरीमुळे काम शोधण्याची व बेरोजगाराची चिंता कायमची मिटली आहे. वर्षभर रोजगार मिळतो आहे. प्राण टेंभूरकर म्हणतात, गेल्या पाच वर्षांपासून नर्सरीत सहकुटुंब कामाला येतो. नर्सरीत वर्षभराचे काम मिळते. आमच्यासारख्या सामान्य माणसांना नर्सरीमुळे कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे.