कामे खोळंबली : तहसीलदार प्रभारी, तर नायब तहसीलदार रजेवरसिराज शेख मोहाडीयेथील नियमित तहसीलदारांचे स्थानांतरण झाल्यानंतर काही काळ नायब तहसीलदारांकडे प्रभार देण्यात आला. मात्र तेही रजेवर गेल्याने भंडारा येथील सहायक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना येथील प्रभार देण्यात आला आहे. आठवड्यातून दोन तीन दिवस येथे ते येत आहेत. तसेच दोन्ही नायब तहसिलदार दीर्घ रजेवर असल्याने मोहाडी तहसिल कार्यालय कधी कधी अधिकारीविना कार्यालयाचा कारभार सुरु आहे.याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून ते संताप व्यक्त करीत आहेत.सर्वसामान्य नागरिकांचा नेहमी तहसिल कार्यालयाशी संबंध येत असतो. त्यामुळे तहसील कार्यालयात दररोजच नागरिकांची गर्दी पाहण्यास मिळते. अशात जर अधिकारी सुटीवर असले किंवा जागेवर नसले तर नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. सोबतच आर्थिक फटका बसतो. असाच काहीशा प्रकार मोहाडी तहसील कार्यालयात सुरू आहे. येथील तहसीलदार जयराम सूर्यवंशी यांची बदली झाल्यानंतर जवळपास एक महिना येथीलच नायब तहसीलदार हरीभाऊ थोटे यांच्याकडे प्रभारी तहसीलदाराचा भार देण्यात आला होता. त्यांनी वैद्यकीय रजा घेतली. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी भंडारा येथील सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी जयंत पोहणकर यांना मोहाडी तहसीलदार म्हणून प्रभार देण्यात आला. मात्र त्यांच्याकडे भंडारा व मोहाडी अशा दोन कार्यालयाचा कारभार असल्याने ते नियमित मोहाडी कार्यालयात उपस्थित राहत नाही. येथील दुसरे नायब तहसीलदार युवराज गणवीर हे १७ डिसेंबरपासून दीर्घ रजेवर गेलेले असून एक जानेवारीला सुद्धा ते रूजू झालेले नाहीत. तहसीलदार नियमित उपस्थित राहात नाही व दोन्ही नायब तहसीलदार रजेवर गेलेले असल्याने सामान्यांच्या कामाचा मोठा खोळंबा होत आहे. मात्र याकडे प्रशासनाने अजिबात लक्ष नाही. एखाद्या कामासाठी तहसिल कार्यालयात गेल्यास अधिकारीच उपस्थित नाही तर कामे कशी होणार, असा प्रश्न तेथील कर्मचारी करतात. मात्र यामुळे तहसील कार्यालयात दुरवरून येणाऱ्या नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. यात दोष कुणाचा, असा प्रश्न उपस्थित होतो. उत्पन्नाचा दाखला, शपथपत्रासह विविध प्रकारच्या दाखल्यावर तहसीलदार किंंवा नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीची आवश्यकता असते. मात्र मोहाडी येथे एकही प्रकारचे तहसीलदार दररोज उपस्थित राहत नसल्याने साधे शपथपत्रासाठीही वारंवार नागरिकांना तहसील कार्यालयाच्या येरझाऱ्या घालाव्या लागत आहे.मोहाडी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार सध्या नायब तहसीलदार युवराज गणवीर यांच्याकडे आहे. मात्र ते मागील १७ डिसेंबरपासून रजेवर असल्याने नगर पंचायतीचाही काम रखडलेला आहे. रोजंदारी मजुरांचे मानधनही अडकलेले आहेत. तसेच धान्य पुरवठा विभाग ना.त. गणवीर यांच्याकडेच असल्याने व त्यांनी आपला कार्यभार दुसऱ्याकडे न सोपविल्याने त्या विभागाचे कामही अडकलेले आहेत. राशन कार्डाचे कामही तुर्तास बंद आहेत. यामुळे सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष दिल्यास माहाडीवासीयांना दिलासा मिळेल.
मोहाडी तहसील कचेरीचा कारभार रामभरोसे
By admin | Published: January 03, 2016 1:11 AM