लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बु.) : सुमारे चार महिन्यांपूर्वी येथील विद्युत वितरण उपकेंद्राच्या सहायक अभियंत्यांचे स्थानांतरण झाले. अद्याप या उपकेंद्रात कायमस्वरूपी अभियंत्यांची नियुक्ती झाली नाही. सद्यस्थितीत येथील प्रभारी अभियंते सरांडी (बु.) येथूनच उपकेंद्र चालवीत असल्याने या उपकेंद्राचा कारभार रामभरोसे सुरू आहे.
या विद्युत वितरण उपकेंद्रांतर्गत परिसरातील २३ गावांना विद्युत पुरवठा केला जातो. मात्र, या केंद्रातील कर्मचाऱ्यांवर सध्या कुणाचाही अंकुश नसल्याने या गावातील वीज ग्राहकांना नेहमीच वीजपुरवठासंबंधीच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यावर्षी जानेवारी महिन्याअखेर येथील सहायक अभियंते खोब्रागडे यांचे स्थानांतरण झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासून या शाखेचा अतिरिक्त कार्यभार सरांडी (बु.) येथील अभियंते लाडके यांच्याकडे सोपविण्यात आला. दोन्ही उपकेंद्रांचा कारभार सांभाळताना त्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र, अभियंते लाडके यांनी मार्च एंडिंगला वीजबिल वसुलीसाठी जितकी तत्परता दाखविली त्याच्या निम्मीही तत्परता सध्या ते दाखवित नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. परिणामी, येथील नागरिकांना वीज पुरवठ्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
सद्यस्थितीत विरली (बु.) उपकेंद्राचा कार्यभार सांभाळत असलेले अभियंता लाडके प्रत्यक्षात येथे न येता तिथूनच येथील कर्मचाऱ्यांना सूचना देऊन उंटावरून शेळ्या हाकत असल्याचे समजते. या परिसरात अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकलेले आहेत, त्यामुळे विद्युत तारा लोंबकळत असल्याने धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तारांपर्यंत गेलेल्या झाडांच्या फांद्या फक्त काही समस्या निर्माण झाल्यानंतर कापल्या जातात. येथील अभियंत्यांच्या अशा हलगर्जीपणामुळेच बुधवारी दुपारी स्पार्किंगमुळे येथे दोन ठिकाणी तनसीच्या ढिगांना आग लागून चार शेतकऱ्यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.
येथील प्रभारी अभियंते बऱ्याचदा कार्यालयात राहात नसल्याने विजेसंबंधी काही समस्या घेऊन महावितरण कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना हात हलवत परतावे लागते. त्यामुळे या उपकेंद्रात तातडीने कायमस्वरूपी अभियंत्यांची नियुक्ती करावी, अशी जनतेची मागणी आहे.