रुग्णांच्या आरोग्याशी खेळ
मोहाडी : प्राथमिक आरोग्य केंद्र, बेटाळा येथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गैरहजरीमुळे व बेताल वागणुकीमुळे सध्या हे रुग्णालय रामभरोसे चालत आहे. यामुळे रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. या ग्रामीण रुग्णालयात रोहा, घाटकुरोडा, बेटाळा, खैरी, रोहना, कुशारी, मोहगाव गावचे रुग्ण तपासणीसाठी येतात. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. गावागावात ताप, मलेरिया, डेंग्यू या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. रुग्ण तपासणी करण्याकरिता येतात. परंतु डॉक्टर, नर्स कुणीही दवाखान्यात उपस्थित राहत नसल्याने त्यांना आल्या पावली परत खासगी दवाखान्यात धाव घ्यावी लागते. याचा गरिबांना आर्थिक भुर्दंड बसतो. बेटाळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेही दुर्लक्ष होत आहे. त्यांनी आरोग्य कर्मचारी यांना जाब विचारण्याची गरज आहे. मात्र, त्यांचेही याकडे लक्ष नाही. वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने येथील आरोग्य कर्मचारी लवकरच स्वाक्षरी मारून घराकडे जातात. सकाळीही वेळेत उपस्थित राहत नाहीत. बुधवार ११ ऑगस्ट रोजी ४.३० वाजता तर संपूर्ण आरोग्य केंद्रच वाऱ्यावर होते. एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. याचा व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन येथील दोषी, कामचुकार कार्यरत कर्मचाऱ्यांवर योग्य कार्यवाही करून गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर जनतेला न्याय देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्र, बेटाळा येथे टाळा ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विश्वनाथ बांडेबुचे, वासुदेव गाढवे, गजानन सपाटे, देवनाथ बांडेबुचे यांच्यासह गावकऱ्यांनी दिला आहे.