नृत्य नाटिका : श्रीराम शोभायात्रा समिती व महर्षी विद्या मंदिराचा उपक्रमभंडारा : कोट्यवधी हिंदूचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीकृष्ण यांच्या जीवन कार्यावर आधारित मधुसुदनाय या संगीत नाट्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. औचित्य होते श्रीराम नवमी उत्सव पर्वाचे. प्रभू श्रीराम शोभायात्रा समिती तथा महर्षी विद्या मंदिर शाळेच्या संयुक्त विद्यमाने खात रोड मार्गावरील रेल्वे मैदानात रविवारी रात्री ७ वाजता सदर नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार नाना पटोले उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार अॅड.रामचंद्र अवसरे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धनंजय दलाल, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, प्राचार्या श्रृती ओहळे, शोभायात्रा समितीचे अध्यक्ष संजय कुंभलकर, सतीश सार्वे, बाळ आंबेकर यांच्यासह अन्य अतिथी उपस्थित होते. परंपरेनुसार गुरु तथा प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेच्या पूजनाने या महानाट्याला सुरुवात करण्यात आली. महानाट्याचे लेखक अॅड.गौरव खोंड, दिग्दर्शक सतीश बगळे, प्राचार्य ओहळे, जयश्री जोशी, अलासपुरे, संगीतराव व अन्य शिक्षकवृंदांच्या सहकार्याने महानाट्य नाटीका सादर करण्यात आली. या नाटीकेत कृष्णजन्म, कृष्णलिला, कृष्णाचा पाळणा, कृष्णाचे विराट स्वरुप, कालिया मर्दन, महारासलिला, सुदामा भेट, राधाक्रिष्ण प्रेम प्रसंग वर्णन, गरबा होळी, दहीहंडी यापेक्षा एक सरस देखावे तथा सादरीकरण महर्षी विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रस्तूत केली तथा उपस्थितांची दाद मिळविली. या महानाटिकेत शाळेच्या जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता हे येथे उल्लेखनीय.प्रास्ताविक प्राचार्य श्रृती ओहळे यांनी तर आभार संजय कुंभलकर यांनी मानले. पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी भाग्यश्री ब्राम्हणकर, संध्या भोवते, अनिता वाघमारे, विनोद पत्थे, हुकरे, रोकडे, प्रज्ञा संगीतवार, कावळे, विभावरी मिश्रा, गंगणे, पाटणे, रंगारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यासह श्रीराम शोभायात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
भंडाराकरांना ‘मधुसुदनाय’ संगीतनाट्याने रिझविले
By admin | Published: April 04, 2017 12:32 AM