कोरोना संकटाचा परिणाम सर्वच व्यवसायांवर दिसून येत आहे. तसाच तो एसटीवरही दिसून येत आहे. त्यामुळे उत्पन्नासाठी एसटी महामंडळातर्फे नवनवीन उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. मालवाहतुकीसाठी अनेक व्यापाऱ्यांचा विविध खाजगी कंपन्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे माहिती विभागीय वाहतूक अधिकारी डॉ. चंद्रकांत वडस्कर यांनी दिली. यासाठी भंडारा विभागात १९ ट्रक तयार करण्यात आले आहेत. त्यातील सर्व ट्रक वाहतुकीसाठी तयार असून वाहतूक सुरू आहेत. २७ मे २०२१ पर्यंत ०९ लाख ९४ हजार ६९४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आतापर्यंत एकशे ९१ फेरी झाल्या असून वीस हजार ९६१ किलोमीटर मालवाहतुकीचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे कोरोना संकटातही एसटीची मालवाहतूक सेवा प्रभावी ठरत आहे.
बॉक्स
२७ मेपर्यंत दहा लाखांची कमाई
एसटीच्या भंडारा विभागात १९ मालवाहू ट्रकमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. यातून २७ मे २०२१ पर्यंत दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. भंडारा विभागात अनेक व्यापारी तसेच खाजगी कंपन्यांकडून एसटीच्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी फायदा होत आहे.
बॉक्स
ॲडव्हान्स मिळतो; पण पगारातून कपात
मालवाहतुकीकरिता एसटीचे चालक बाहेरगावी जाताना कर्तव्यावरील चालकांना तेथे मुक्कामही करावा लागतो. या मुक्कामाच्या काळात जेवण, चहा, नाश्ता असा सर्व खर्च चालकांना स्वतः करावा लागतो. मात्र, अनेकदा चालकांची गैरसोय टाळण्यासाठी चालकांना एसटी महामंडळातर्फे ॲडव्हान्स रक्कम दिली जाते. चालकांना दिलेला ॲडव्हान्स हा त्यांच्या पगारातून कट केला जातो. त्यामुळे एखाद्याला ॲडव्हान्स नको असल्यास मात्र त्याला सक्ती करण्यात येत नाही. आलेल्या मालवाहतुकीतून भाड्यातून वेळप्रसंगी काही खर्च करण्याची मुभा असली, तरी खर्च केलेल्या पैशांची भाड्याची रक्कम आगारात जमा करावी लागते. बॉक्स परतीची मालवाहतूक मिळेपर्यंत तेथेच मुक्काम प्रवासी वाहतूक करताना चालकांना परतीची मालवाहतूक मिळेपर्यंत तेथे मुक्काम करावा लागतो. अनेकदा दोन दिवस ते चार दिवसांपर्यंत बाहेर थांबावे लागते. मालवाहू ट्रक घेऊन गेल्यानंतर तेथे दुसरे भाडे मिळविण्यासाठी एसटीचे अधिकारी प्रयत्नशील असतात. मात्र, काहीप्रसंगी बुकिंग मागे- पुढे होतात. यासाठी अनेकदा चालकांचेही सहकार्य अपेक्षित असते.
कोट
संकटात एसटीला मालवाहतुकीतूनही चांगला फायदा होत आहे. मात्र, चालकांना अनेकदा परतीचे भाडे मिळेपर्यंत चार-पाच दिवस घराबाहेरच थांबावे लागते. काही वेळा जेवणाची सोय होते, तर अनेकदा स्वतः जेवणाचे साहित्य घेऊनच बाहेरगावी जावे लागते.
एक चालक
कोट
मालवाहतुकीचा ट्रक घेऊन जाताना अनेकदा आम्हाला ॲडव्हान्स दिला जातो. मात्र, ॲडव्हान्स हा आमच्या पगारातून कपात होतो. त्यामुळे एसटीतर्फे बाहेरगावी जाताना प्रोत्साहन भत्ता सुरू करावा, अशी आमची मागणी आहे.
एक चालक
कोट
एसटी महामंडळातर्फे मालवाहतूक करणाऱ्या चालकांची, कर्मचाऱ्यांची योग्य काळजी घेतली जाते. चालकांना अनेकदा अनामत रक्कम हवी असल्यास त्यांना तात्काळ देण्याच्या सूचनाही सर्व आगारप्रमुखांना दिल्या आहेत. एसटीच्या मालवाहतूक सेवेला व्यापाऱ्यांसह, खाजगी कंपन्यांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याने एसटीच्या उत्पन्न वाढीस हातभार लागत आहे. अनेकांनी एसटीच्या मालवाहतूक सेवेचा लाभ घ्यावा.
-डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा.