लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कंटेन्मेंट झोनमध्ये एक हजार रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट करण्यात येणार असून त्यामुळे १५ मिनिटात कोरोनाचे निदान होणार आहे. कमी वेळात अधिक चाचण्या यामुळे शक्य होणार असल्याचे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी बुधवारी येथील जिल्हा परिषद सभागृहात आयोजित आढावा बैठकीत सांगितले.कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्थेसंबंधी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, अपर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावरकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, आरोग्य अधिकारी डॉ.सचिन चव्हाण उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, रॅपीड अॅन्टीजेन टेस्टसाठी विशिष्ट पथक तयार करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या चाचणीसाठी तालुकास्तरावर केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच आवश्यक तेथे मोबाईल व्हॅनद्वारे या चाचणीची सुविधा दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तहसीलदार, गटविकास अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी आपसातील समन्वयासाठी सदर बैठका घ्याव्यात, गृह भेटी, सर्वेक्षणाचे काम व्यवस्थित होत आहे की नाही याची फेरतपासणी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. याकडे लक्ष देऊन गृह सर्वेक्षण व फेरसर्वेक्षणात गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. गृह सर्वेक्षणाच्या कामात ग्रामस्तरावर तलाठी यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करावे असे त्यांनी सांगितले. संस्थात्मक व गृहविलगीकरणातील व्यक्तींवर आतापर्यंत तीन एफआयआर करण्यात आले आहे. या कामात तहसीलदार व पोलीस विभागाने सहकार्य करावे तसेच कलम १४४चे योग्य पालन जिल्ह्यातील व्यक्ती करीत आहेत की नाही यावर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज्यातील महत्त्वपूर्ण गणेशोत्सवाच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व विभागाने आपल्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेतू अॅप अपलोड करून घ्यावे. संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये सुविधा उपलब्ध करून स्वच्छता ठेवा, उपविभागीय अधिकाऱ्यांनी कंटेन्मेंट झोनवर बारीक लक्ष ठेवावे, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी विना परवानगी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ट्रक व वाहनांवर दंड आकारावा तसेच लोडेड वाहनांवर देखील दंड आकारावा असे सांगितले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस म्हणाल्या, संस्थात्मक क्वारंटाईनची व्यवस्था तहसीलदारांकडे असून त्याबाबत व्यवस्थापन करा, गृहभेटीदरम्यान वारंवार ताप, सर्दी, खोकला यांची लक्षणे असलेल्यांची यादी अपडेट करा असे सांगितले. सर्वेक्षणाच्या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.कंटेन्मेंट झोनमधून जाण्यायेण्यास प्रतिबंधसध्या राज्यात अनलॉक सुरु झाला आहे. दैनंदिन व्यवहार करण्यासोबत नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच कंटेन्मेंट झोनमधून ये-जा करण्यास कुणालाही परवानगी देण्यात येणार नाही. तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या सर्व पासेस रद्द करण्यात येत असल्याने पोलिसांनी सतर्क राहावे असे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सांगितले.टाळेबंदीच्या काळात दंड वसूलटाळेबंदीच्या काळात नगरपालिका व नगरपंचायतीकडून दंड वसूल करण्यात आला. यामध्ये मास्क न वापरणारे व्यक्ती, दुकानदार आणि इतरांचा समावेश आहे. यात लाखनी नगरपंचायतीने एक लाख ७५ हजार रुपये, साकोली नगरपरिषदेने एक लाख ८५ हजार, पवनी नगरपरिषदेने एक लाख ६८ हजार आणि लाखांदूर नगरपंचायतीने ६५ हजार रुपये दंड वसूल केला. इतर नगरपरिषदांनीही मोहिम उघडली आहे.जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू नाहीमहाराष्ट्रात भंडारा आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाºयांनी भान ठेवून डाटा कलेक्शनवर प्राधान्याने लक्ष द्यावे. सुक्ष्म तपासणी करावी. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यासाठी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
कंटेन्मेंट झोनमध्ये रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 5:00 AM
सर्व विभागाने आपल्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेतू अॅप अपलोड करून घ्यावे. संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये सुविधा उपलब्ध करून स्वच्छता ठेवा, उपविभागीय अधिकाऱ्यांनी कंटेन्मेंट झोनवर बारीक लक्ष ठेवावे, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी विना परवानगी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ट्रक व वाहनांवर दंड आकारावा तसेच लोडेड वाहनांवर देखील दंड आकारावा असे सांगितले.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : १५ मिनिटात होणार कोरोना निदान, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य